सीएनसी टूलिंग साहित्य चोरी; साडेबारा लाखांचा ऐवज लंपास
इचलकरंजी:
इचलकरंजी शहरातील जुनी नगरपालिकेसमोरील भाड्याच्या दुकान गाळ्यातून सीएनसी टूलिंग उद्योगासाठी वापरण्यात येणारे सुमारे १२ लाख ४५ हजार रुपयांचे साहित्य चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी इचलकरंजी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय शिवगोंडा पाटील (वय ४०, रा. कदम मळा, चंदूर, ता. हातकणंगले) हे सीएनसी-व्हीएनसी ट्रेडिंग व टूलिंग व्यवसाय करतात. त्यांचे इचलकरंजीतील जुनी नगरपालिकेसमोरील भाड्याच्या दुकान गाळ्यात ठेवण्यात आलेले साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे समोर आले आहे.
ही घटना १० जूनच्या रात्री ९.३० ते ११ जूनच्या सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये कार्बाईन रॉड, कार्बाईन स्क्रॅप, विविध प्रकारचे कटिंग टूल्स, कार्बाईन इन्सर्ट तसेच औद्योगिक वापरातील अन्य टूलिंग साहित्याचा समावेश आहे. चोरीस गेलेल्या साहित्याची एकूण किंमत १२ लाख ४५ हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.
फिर्यादीच्या तक्रारीवरून इचलकरंजी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळेकर करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





