पंचगंगा घाट विकासासाठी महापौरांना निवेदन; आयुक्तांकडून भेट न मिळाल्याचा नगरसेविका विजया महाजन यांचा आरोप
इचलकरंजी ल:
इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदी घाटाचा हरिद्वारच्या धर्तीवर विकास करण्याच्या मागणीसाठी नगरसेविका सौ. विजया सुनील महाजन व विनय महाजन यांनी महापौर उदय धातूंडे यांना निवेदन दिले.
नदी घाटाची लांबी वाढवणे, दोन्ही बाजूंना घाट बांधणे, जुना बंधारा हटवून पुढील बाजूस नवीन बंधारा उभारणे, नदीपात्रातील गाळ काढून नदीची खोली वाढवणे तसेच घाट परिसराचे सुशोभीकरण करणे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यावेळी महापौर उदय धातूंडे यांनी सकारात्मक भूमिका घेत या विषयावर लवकरच योग्य कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.
दरम्यान, याच मागण्यांचे निवेदन देण्यासाठी नगरसेविका विजया महाजन या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या दालनात गेल्या असता आयुक्तांची अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू असल्याने १० ते १५ मिनिटे थांबण्यास सांगण्यात आले. मात्र दीड तास प्रतीक्षा करूनही भेट न झाल्याचा आरोप त्यांनी केला.
नागरी सुविधांच्या प्रश्नांसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधीला वेळ न देणे, तर इतर नागरिकांना त्वरित भेट देणे ही बाब खेदजनक असल्याचे महाजन यांनी सांगितले. याबाबत त्यांनी विनय महाजन यांच्यासह महापौर उदय धातूंडे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींना अशा प्रकारची वागणूक योग्य नसून याचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा पुढील भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
महापौर उदय धातूंडे यांना निवेदन देताना विजया महाजन,विनय महाजन,तानाजी पोवार
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






