ICHMH51NEWS.IN
9921600800

रोटरी सेंट्रलतर्फे विद्यार्थी दत्तक योजना उपक्रमात शैक्षणिक साहित्य वितरण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रोटरी सेंट्रलतर्फे विद्यार्थी दत्तक योजना उपक्रमात शैक्षणिक साहित्य वितरण

इचलकरंजी दि.१८ ऑगस्ट-
“आजच्या समाज जीवनात शिक्षण आणि शिक्षकांकडून होणारे संस्कार या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ही आपल्या समाजाच्या व देशाच्या प्रगतीसाठी पूरक ठरणारी आहे. त्यामुळे सर्व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर त्यांनीही मोठेपणी, भविष्य काळात समाजासाठी कार्य करावे” अशा आशयाचे प्रतिपादन रोटरी प्रांत ३१७१चे नियुक्त प्रांतपाल अशोक नाईक, बेळगाव यांनी केले. येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलतर्फे आणि एन. वाय. फाउंडेशन मुंबई (अभिनेते अजय देवगण पुरस्कृत) यांच्या सहभागाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. त्या अंतर्गत शालेय साहित्य वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.

त्यापूर्वी माजी अध्यक्ष घनश्याम सावलानी यांनी प्रास्ताविक केले तर रोटरी प्रांत ३१७०चे सहाय्यक प्रांतपाल अशोक जैन यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात पाहुणे व पदाधिकारी यांच्या हस्ते सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींना शालेय गणवेश व सर्व साहित्य आणि स्कूल बॅग यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या देणगीदारांना पाहुण्यांच्या हस्ते पुष्प प्रदान करण्यात आले

कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष विमलकुमार बंब यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी एन वाय फाउंडेशन, मुंबई यांच्या प्रतिनिधी सौ. छाया भुतडा यांनी पाहुण्यांना भेटवस्तू प्रदान केली. कार्यक्रमात शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या सौ. विद्या पाटील आणि भारती हायस्कूलचे महालिंग मिठारी यांनी तसेच गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी माहम मांगुरे हिने आपले मनोगत व्यक्त केले.

सदरच्या कार्यक्रमात इचलकरंजी व परिसरातील विविध २४ हायस्कूलच्या साधारणपणे १२० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. शेवटी सेक्रेटरी प्रमोद महाजन यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष संजय होगाडे यांनी केले. येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पालक आणि रोटरी सदस्य उपस्थित होते.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा