पगार थकला; १२९ सफाई कामगारांचे काम बंद
इचलकरंजी :
ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे वेतन थकीत असल्याने महापालिकेच्या सफाई व्यवस्थेतील १२९ कंत्राटी सफाई कामगारांनी गुरुवारपासून (दि. ७) काम बंद आंदोलन सुरू केले आहे. दसरा सण तोंडावर असताना वेतन थकल्याने कामगारांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
महापालिकेने शहरातील सफाईचे काम आठ कंत्राटदारांकडे सोपविले असून, एकूण २७९ कामगारांपैकी १२९ जणांचे दोन महिन्यांचे वेतन थकीत असल्याचा आरोप आहे. महापालिकेचे बिल मिळाल्यानंतरच वेतन देण्यात येईल, असे कंत्राटदारांकडून सांगितले जात असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. आंदोलन केल्यास दंडाची रक्कम वसूल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप त्यांनी केला.
थकीत वेतन किमान वेतनानुसार वाढीव भत्त्यासह बँक खात्यावर जमा करावे, या मागणीसाठी शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. वेतन जमा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे शहराच्या स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.


