पाणीगळती रोखण्यासाठी महापालिकेची विशेष मोहीम राबवा : दाभोळे
इचलकरंजी :
संभाव्य पाणीटंचाई व पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी महापालिकेने स्वतःच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील पाण्याचा अपव्यय रोखावा, अशी मागणी उमाकांत दाभोळे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील अनेक कुपनलिकांना योग्य तोट्या नसल्याने पाणी उपसा केल्यानंतर ते वाहून जाते. त्यामुळे सर्व कुपनलिकांचे सर्वेक्षण करून आवश्यक ठिकाणी तोट्या बसवाव्यात. तसेच जलकुंभ, फिल्टर हाऊस, मुख्य पाणीपुरवठा वाहिन्या, व्हॉल्व्ह व पंपिंग यंत्रणेची विशेष तपासणी करून आढळणारी गळती तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी त्यांनी केली.
जलकुंभ भरल्यानंतर होणारा पाण्याचा ओव्हरफ्लो रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. पाणीगळती शोधण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करून शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेची नियमित तपासणी करावी, असेही दाभोळे यांनी म्हटले आहे.
‘पाणी वाचवा, पाणी वाहू देऊ नका’ या संदेशातून नागरिकांमध्ये जनजागृती करताना महापालिकेने स्वतःच्या यंत्रणेतील पाण्याचा अपव्यय थांबवून पाणी बचतीची सुरुवात करावी, अशी मागणी त्यांनी केली.


