११ वर्षे सत्ता असूनही इचलकरंजीचे मूलभूत प्रश्न प्रलंबितच
मलाबादेनगर येथे शिव–शाहू विकास आघाडीची कॉर्नर सभा; शशांक बावचकर यांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका
इचलकरंजी :
केंद्रात आणि राज्यात तब्बल ११ वर्षे सत्ता असतानाही इचलकरंजी शहराचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. आता पुन्हा खोटी आश्वासने देत सत्ताधारी मतांची मागणी करत आहेत. त्यामुळे विकासकामे न करणाऱ्यांना बाजूला सारून शिव–शाहूंच्या विचारांवर कार्यरत असलेल्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांनी केले.
प्रभाग क्रमांक १ मधील शिव–शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मलाबादेनगर येथे आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते. बावचकर म्हणाले, गेल्या १६ वर्षांपासून शहराचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. तरीही सत्ताधारी पुन्हा ‘आम्हीच पाणी देणार’ असे सांगत आहेत. मग आतापर्यंत हा प्रश्न सोडवताना त्यांचे हात कोणी बांधले होते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रत्येक विकासकामात टक्केवारी वाढली असून सत्ताधाऱ्यांचे आमदार व खासदार असतानाही शहरातील मूलभूत प्रश्न सुटत नसल्याची टीका त्यांनी केली. महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात आमदार व खासदारांचा हस्तक्षेप वाढला असून गटारीची कामे न करता निधी लाटला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जनतेच्या कररूपाने जमा झालेला पैसा विकासकामांच्या नावाखाली मक्तेदारांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या खिशात जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता जनतेनेच परिवर्तनाचा निर्धार केला असून शिव–शाहू विचारांच्या उमेदवारांना मतदान करून या परिवर्तनाच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी दत्ता माने यांनी गेली दहा वर्षे शहराला पाणी देण्याचे आश्वासन देत आमदार व खासदारांची फसवणूक होत असल्याचे सांगितले. पाणी योजना मंजूर असूनही त्याची अंमलबजावणी केली जात नाही. तरीही मुख्यमंत्री, आमदार व खासदार आम्हीच विकास केला, असे कोणत्या तोंडाने सांगतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बजरंग लोणारी यांनी जोपर्यंत मंजूर झालेली पाणी योजना प्रत्यक्ष कार्यान्वित होत नाही, तोपर्यंत शिव–शाहू विकास आघाडी गप्प बसणार नसल्याचे स्पष्ट केले.
प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवार उदयसिंग पाटील यांनी सांगितले की, भागातील विकासकामांसाठी टेंडर काढले जातात; मात्र एका नगरसेवकाने गटारीचे टेंडर काढून प्रत्यक्ष काम न करता पालिकेतून बिले काढली आहेत. विकासकामे न करता बिले खाणाऱ्यांना आपण निवडून देणार का, असा सवाल उपस्थित करत सत्ताधाऱ्यांचा उर्मटपणा मोडून काढण्यासाठी व भागाच्या विकासासाठी शिव–शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सचिन राणे, रुपाली कोकणे, स्वाती लोखंडे, नितीन कोकणे यांनी सर्वांना सोबत घेऊन भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सेवेची संधी देण्याचे आवाहन केले. सभेला मधुकर मगदुम, दिपक कांबळे, रतन वाझे यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मलाबादे नगर येथील सभेत बोलताना शशांक बावचकर समोर उपस्थित जनसमुदाय
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







