ICHMH51NEWS.IN
9921600800

अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयासाठी २६.१४ कोटींचा निधी मंजूर.आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश;वाढत्या गुन्हेगारीला बसणार आळा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयासाठी २६.१४ कोटींचा निधी मंजूर.आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश; वाढत्या गुन्हेगारीला बसणार आळा

इचलकरंजी :
शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने इचलकरंजी येथे अप्पर पोलीस अधीक्षक व पोलीस उपअधीक्षक यांची कार्यालये एकाच ठिकाणी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, त्यासाठी शासनाकडून २६ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामासाठी आमदार राहुल आवाडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
इचलकरंजी शहर व परिसरात औद्योगिकीकरणामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत असून शहराचा विस्तारही वेगाने होत आहे. त्याचबरोबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक यांची कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी आमदार आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता.
या प्रयत्नांना यश मिळाले असून गावभाग पोलीस ठाण्यालगत अप्पर पोलीस अधीक्षक व पोलीस उपअधीक्षक यांची स्वतंत्र कार्यालये उभारली जाणार आहेत. तसेच राखीव पोलीस दलातील ४० जवानांच्या निवासाची सुविधाही या प्रकल्पामध्ये करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने २६ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या नवीन प्रशासकीय संकुलामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम वातावरण उपलब्ध होणार असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास तसेच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेतही वाढ होईल, असा विश्वास आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केला.
शासनाच्या या निर्णयाचे शहरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, इचलकरंजीच्या वाढत्या गरजांनुसार पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा