काळा ओढा पुर्नजिवीत करणार,कचऱ्याचे नियोजन करणार-उपमहापौर अनिल डाळ्यांचे इनामला आश्वासन
इचलकरंजी :
शहरातील रस्ते, गटारी, कचरा व्यवस्थापन, पावसाळी नियोजन तसेच सार्वजनिक सुविधांशी संबंधित विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी इचलकरंजी नागरिक मंचया वतीने महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले.हे निवेदन उपमहापौर अनिल डाळ्या यांनी स्वीकारले.
निवेदनात शहरातील खड्डेमय रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी डांबरी पॅचवर्क करावे, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या ५२ कोटी रुपयांच्या कामांतील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, सर्व सारण गटारींची स्वच्छता करावी तसेच फुटपाथ परिसरात साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
तसेच स्व.किसनराव आवळे स्टेडियममधील रिकामे दुकानगाळे लिलाव प्रक्रियेद्वारे उपलब्ध करून द्यावेत,डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक दरम्यान सुरू असलेल्या नवीन रस्त्याच्या वाढलेल्या उंचीमुळे पाण्याचा निचरा कसा होणार याबाबत स्पष्टता द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
मनपा क्षेत्रातील कुपनलिकांवर पूर्वी राबविण्यात आलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचा आढावा घेऊन ते पुन्हा कार्यान्वित करावेत,शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावे,पावसाळा संपेपर्यंत रस्ते खुदाई थांबवावी,कचरा स्पॉट आधुनिक पद्धतीने विकसित करावेत तसेच काळ्या ओढ्यातील प्लास्टिक काढून स्वच्छता मोहीम राबवावी, अशा मागण्यांचाही समावेश होता.
याशिवाय शहरात किती सार्वजनिक मुताऱ्या शिल्लक आहेत व त्यांची सद्यस्थिती काय आहे,याबाबत मनपाने स्पष्ट नियोजन जाहीर करावे, अशी मागणी नागरिक मंचच्या वतीने करण्यात आली.
यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या यांनी शहरातील बऱ्याच मुताऱ्या जीर्ण झाल्या असून त्या अद्ययावत करण्यात येतील,सारण गटारी स्वच्छतेचे नियोजन सुरू आहे,स्व. किसनराव आवळे मैदान परिसरातील रिकाम्या गाळ्यांचा विषय भाडेनिश्चितीनंतर पुढील सभेत मांडला जाईल,पूर्वीच्या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची माहिती घेऊन त्यावर कार्यवाही करण्यात येईल,कचरा उठावाचे योग्य नियोजन केले जाईल तसेच काळा ओढा पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
यावेळी राम आडकी,दीपक पंडित,महेंद्र जाधव,इम्तियाज मुल्ला,सुषमा साळुंखे,गीता माने,अभिजित पटवा उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






