राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा त्रैवार्षिक स्नेहमेळावा उत्साहात
इचलकरंजी :
येथील राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा त्रैवार्षिक स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आयोजित या मेळाव्यास १९७० सालापासून ते गतवर्षीच्या बॅचपर्यंतच्या तब्बल १३५० माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित राहिल्याने हा मेळावा विक्रमी ठरला.
मेळाव्याच्या प्रारंभी सर्व माजी विद्यार्थी शाळेच्या पटांगणात एकत्र आले. कवायत, प्रार्थना आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात फेरफटका मारत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. पुढे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीद्वारे मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे आगमन करण्यात आले.
मेळाव्यात आजी-माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष वसंतराव सपकाळे यांनी स्वागत केले, तर कार्याध्यक्ष इराण्णा सिंहासने यांनी प्रास्ताविकातून मेळाव्याच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. यावेळी बी. बी. हुपरे, वैशाली नाईकवाडे, पुष्पा मोरे व श्री. कोळेकर यांनी मनोगत व्यक्त करत माजी विद्यार्थी मेळावे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शंकर पोवार होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी शाळेच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेत शाळेची शैक्षणिक वाटचाल आणि विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीची माहिती दिली. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी तथा महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी चित्रफितीद्वारे शिक्षक व माजी विद्यार्थ्यांना संबोधित केले.
दिवसभर चाललेल्या या मेळाव्यात हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम, फनी गेम्स तसेच विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती आदर व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. ए. पाटील व सौ. यू. पी. जाधव यांनी केले, तर आभार प्रमोद इदाते यांनी मानले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी नेताजी बिरंजे, मुकुंद तारळेकर, रमेश धोत्रे, युवराज मगदूम, विजय मुनोळी, बसवराज कोटगी, हरिदास सोनटक्के, जाफर जिडगे, शैला गायकवाड, उमेश लाड, आनंदा मुसळे, जानबा कांबळे, चंद्रकांत कदम, मंगल सुर्वे, अनिल लोकरे, किरण पाटील, प्रमोद इंगवले, सुभाष कुराडे, रसिका साळुंखे, सुनील मांगलेकर, महेश खांडेकर, विजय हावळ यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





