कामगारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नेतृत्वाचे स्मरण भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे – प्रकाश आवाडे.कै.शामराव कुलकर्णी यांच्या नावाने मार्गाचे नामकरण
इचलकरंजी :
कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे आणि कामगार चळवळीला दिशा देणारे ज्येष्ठ कामगार नेते कै. शामराव कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एका मार्गाला त्यांचे नाव देण्यात आले. राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटना (इंटक) आणि रवि रजपुते फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ‘इंटक नेते कै. शामरावजी कुलकर्णी मार्ग’ या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी कै. शामराव कुलकर्णी यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, “कै. कुलकर्णी यांनी संपूर्ण आयुष्य कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करण्यात व्यतीत केले. त्यांचे कार्य आजही कामगार चळवळीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या नावाने मार्गाचे नामकरण होणे ही त्यांना वाहिलेली योग्य आदरांजली असून भावी पिढ्यांनाही त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळत राहील.”
कार्यक्रमात नामफलकाचे अनावरण माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार राहुल आवाडे आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नगरसेवक रवि रजपुते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटनेचे जॉइंट सेक्रेटरी राजेंद्र बचाटे यांनी प्रास्ताविकातून कै. शामराव कुलकर्णी यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या कामगार चळवळीतील योगदानावर प्रकाश टाकला. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत नरसिंह पारीक यांनी केले.
महापौर उदय धातुंडे यांनीही मनोगत व्यक्त करत कै. कुलकर्णी यांच्या कार्याचे स्मरण केले. कार्यक्रमास उपमहापौर अनिल डाळ्या, प्रकाश दत्तवाडे, विलास गाताडे, रणजित कदम, विजय कामत, राजेंद्र बोहरा, राधेश्याम शर्मा, बाळासाहेब कलागते, अनिल कुडचे, मुकूंदराव फाटक, विजयालक्ष्मी कुलकर्णी, विद्या साळुंखे, तानाजी पवार, दिलीप मुथा, सीईटीपीचे चेअरमन बापूसाहेब तेरदाळे, गिरीराज मोहता, श्रीनिवास बोहरा, लक्ष्मीकांत मर्दा, प्रकाश गौड, संजय कुलकर्णी, प्रदीप साहू, दशरथ मोहिते, राजू बोंद्रे, सतीश मुळीक, प्रमोद बचाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी भोसले यांनी आभार मानले. कामगारांच्या हितासाठी आयुष्य वेचलेल्या एका लढवय्या नेत्याच्या स्मृती जपणारा हा उपक्रम असल्याने उपस्थितांनी त्याचे स्वागत केले.
कै.शामराव कुलकर्णी मार्गाच्या फलक अनावरण प्रसंगी मान्यवर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






