ICHMH51NEWS.IN
9921600800

सुळकूडचे पाणी मिळेपर्यंत संघर्ष सुरूच; जल पदयात्रेतून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सुळकूडचे पाणी मिळेपर्यंत संघर्ष सुरूच; जल पदयात्रेतून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड

इचलकरंजी :

सुळकूड पाणी योजना तातडीने कार्यान्वित करावी या मागणीसाठी शिव-शाहू विकास आघाडीतर्फे शुक्रवारी शहरातून २५ किलोमीटरची जल पदयात्रा काढण्यात आली. गावभागातील प्राचीन महादेव मंदिरापासून सुरू झालेल्या या पदयात्रेचा समारोप शहापूर चौकातील जाहीर सभेने झाला. यावेळी झालेल्या सभेत वक्त्यांनी शहराच्या पाणीप्रश्नावर सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका करत सुळकूडचे पाणी शहरात येईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

नगरसेवक मदन कारंडे यांनी आपल्या भाषणात गेल्या अनेक दशकांपासून शहरातील नागरिकांची पाणीप्रश्नी दिशाभूल होत असल्याचा आरोप केला. सुळकूड योजना कार्यान्वित होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे सांगत त्यांनी पाणीप्रश्नी लोकप्रतिनिधींनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.

विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील यांनी राज्यात व केंद्रात सत्ता असूनही शहराचा पाणीप्रश्न सुटलेला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पाणीप्रश्न सोडविण्यात अपयश आले तर नागरिकांनी खासदार व आमदारांना जाब विचारावा, असे आवाहन त्यांनी केले त्याचबरोबर २४ तास पाणी देतो पासून मीच पाणी देतो असे म्हणत प्रकाश आवाडे फसवत आहेत, हाळवणकर साहेबांचा तोंडचा घास प्रकाश आवाडेंनी आपल्या युवराजाच्या घशात घातल्याची सडकून टीका त्यांनी करत पाणीपुरवठा विभागातील कारभारावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शशांक बावचकर यांनी गेल्या चार वर्षांपासून विविध संघटना आणि कार्यकर्ते पाणीप्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढा देत असल्याचे सांगितले. कोणत्याही पक्षाचे राजकारण न करता शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावे हीच आंदोलनामागील भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सभेतील इतर वक्त्यांनीही १९८० पासून शहरातील पाणीप्रश्न प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित केला. पाणी हा पुढील पिढ्यांच्या भवितव्याशी संबंधित विषय असल्याने नागरिकांनी या प्रश्नावर अधिक जागरूक होण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पाणीप्रश्न सुटत नसेल तर संबंधित लोकप्रतिनिधींनी जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी नगरसेवक रणजीत जाधव, अमरजीत जाधव, सयाजी चव्हाण, संजय तेलनाडे, माजी नगरसेवक अब्राहम आवळे, नितीन कोकणे यांची भाषणे झाली. मंचावर नगरसेवक नंदकुमार पाटील, शिवाजी पाटील, सुनील तेलनाडे, सचिन राणे, वाजीद तासगांवे, गणेश सावरतकर तसेच नगरसेविका रुपाली कोकणे, यास्मीन तासगांवे, स्वाती लोखंडे आदी उपस्थित होते.

नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

सुळकूड येथील दुधगंगा नदीचे जल कलशातून आणून महादेव मंदिरात जलाभिषेक केल्यानंतर पदयात्रेला प्रारंभ झाला. हातात विविध घोषणांचे फलक घेऊन कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. शहरातील विविध भागांत नागरिकांनी, विशेषतः महिला वर्गाने, पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले. रखरखत्या उन्हातही मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने पाणीप्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

आजूबाजूच्या गावात पाणी मिळते पण इचलकरंजीला मिळत नाही इचलकरंजी शहर पाकिस्तानात आहे का याचे उत्तर आमदारांनी द्यावे- रणजित जाधव
शुद्ध पाण्यासाठी आमदार कोल्हापुरात राहतात व इचलकरंजीचे राजकारण करतात- संजय तेलनाडे
प्रत्येक निवडणुकीस पाणी मीच देणार म्हणत आवाडे इचलकरंजीची दिशाभूल करत आहेत-अब्राहम आवळे

बोलताना मदन कारंडे,उपस्थित उदयसिंग पाटील, रणजित जाधव,शशांक बावचकर,संजय तेलनाडे, शिवाजी पाटील

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *