राजस्थानातील बंद प्रोसेस हाऊसबाबत महाराष्ट्र शासनाची तातडीची पावले; वस्त्रोद्योगाला दिलासाची आशा
मुंबई, ता. २४ : राजस्थानातील पाली, बालोतरा आणि जोधपूर येथील बंद प्रोसेस हाऊसमुळे महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग संकटात सापडल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने तातडीने हस्तक्षेप केला आहे. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर सावकारे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना अधिकृत पत्र पाठवून बंद प्रोसेसिंग उद्योग पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे.
पत्रात महाराष्ट्रातील सूतगिरण्या व यंत्रमाग उद्योगातून तयार होणारे ग्रे कापड प्रक्रियेसाठी राजस्थानात पाठविले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र पर्यावरणीय कारणांमुळे तेथील अनेक प्रोसेस हाऊस बंद झाल्याने इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव, विटा, सोलापूर व नागपूर येथील वस्त्रोद्योगावर गंभीर परिणाम झाला असून उत्पादन, विक्री आणि रोजगारावर विपरीत परिणाम होत आहे.
दरम्यान, राजस्थान शासनाने या पत्राची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयातून संबंधित सचिवांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बंद प्रोसेस हाऊस पुन्हा सुरू होण्याबाबत आशावाद निर्माण झाला असून, यामुळे महाराष्ट्रातील लाखो यंत्रमागधारक, उद्योजक व कामगारांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाने व्यक्त केली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





