२३ कोटींच्या रस्ता प्रस्तावावरून इचलकरंजीत खळबळ; ‘चांगला रस्ता का तोडता?’ विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांचा प्रशासनाला थेट सवाल
इचलकरंजी, ता. ६ : इचलकरंजी शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक (शिवतीर्थ) ते महात्मा गांधी पुतळा या सुस्थितीतील मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी सुमारे ₹२३ कोटींचे अंदाजपत्रक तयार करून राज्य शासनाकडे निधी मागणीचा प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरू असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा महापालिका प्रशासनाने तात्काळ खुलासा करावा, अन्यथा जनतेसमोर सर्व सत्य मांडून तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
पाटील म्हणाले, शहरातील हा रस्ता आजही चांगल्या स्थितीत असून वाहतुकीसाठी सक्षम आहे. असे असताना त्याच रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी तब्बल ₹२३ कोटींचा प्रस्ताव तयार करण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शहरातील अनेक भागांतील रस्ते गॅस पाइपलाइन, ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि भूमिगत केबलच्या कामांमुळे उखडले असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा रस्त्यांना प्राधान्य देण्याऐवजी सुस्थितीतील रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यामागील कारण स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.
महापालिकेकडे स्वतंत्र बांधकाम विभाग, अभियंते आणि तांत्रिक यंत्रणा उपलब्ध असताना हा प्रस्ताव कोणत्या तांत्रिक निकषांवर तयार केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित करत संबंधित सर्वेक्षण अहवाल, अंदाजपत्रक आणि कारणमीमांसा सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी केली.
यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते महासत्ता चौक या अधिक लांबीच्या आणि रुंदीच्या रस्त्यासाठी शासनाने १२ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यापेक्षा कमी लांबीच्या आणि चांगल्या स्थितीतील शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा रस्त्यासाठी तब्बल २३ कोटींचा प्रस्ताव कसा तयार झाला, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, असेही त्यांनी म्हटले.
शासनाचा निधी हा जनतेच्या करातून जमा झालेला पैसा असल्याने प्रत्येक रुपयाचा वापर पारदर्शक आणि सार्वजनिक हिताचा असला पाहिजे. विकासकामांना विरोध नसून अनावश्यक खर्चावर प्रश्न उपस्थित करणे हे विरोधी पक्षाचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट करत महापालिका आयुक्तांनी तातडीने अधिकृत खुलासा करावा, अन्यथा या विषयावर व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी दिला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





