तिमोर लेस्टेमध्ये MBBS शिक्षणाच्या संधींबाबत श्रद्धा इन्स्टिट्यूटतर्फे विशेष मार्गदर्शन
इचलकरंजी :
श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटतर्फे विद्यार्थ्यांना व पालकांना परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विशेष विद्यार्थी-पालक सेमिनार व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी तिमोर लेस्टे येथे MBBS शिक्षणाच्या उपलब्ध संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या उपक्रमासाठी भारतातील तिमोर लेस्टेचे राजदूत कार्लिटो न्युन्स (Karlito Nunes) यांना संस्थेत निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना तिमोर लेस्टे येथील वैद्यकीय शिक्षणाची पद्धत, उपलब्ध सुविधा आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या संधींबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमापूर्वी झालेल्या विद्यार्थी-पालक सेमिनारमध्ये परदेशात वैद्यकीय शिक्षण घेताना आवश्यक बाबी, शैक्षणिक वातावरण, महाविद्यालयीन सुविधा तसेच भारतीय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सोयी यांची माहिती देण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेत संस्थेच्या या उपक्रमाची माहिती माध्यमांसमोर मांडण्यात आली.
श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटने यावर्षीपासून विद्यार्थ्यांना तिमोर लेस्टे येथे MBBS शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा पुढाकार घेतला आहे. यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींनी स्वतः तिमोर लेस्टेला भेट देऊन तेथील वैद्यकीय महाविद्यालय, अभ्यासक्रम, शैक्षणिक पद्धती, हॉस्टेल, लायब्ररी, प्रयोगशाळा आणि रुग्णालयातील सुविधा यांचा प्रत्यक्ष अभ्यास केला आहे. तसेच तेथे शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधून विविध बाबींची माहिती घेतल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
भारतीय विद्यार्थ्यांसाठी भारतीय शिक्षक, भारतीय पुस्तके, भारतीय पद्धतीचे जेवण तसेच भारताशी सुसंगत शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही तेथील व्यवस्थेचा अभ्यास करण्यात आला आहे. संस्थेच्या मते, संबंधित वैद्यकीय शिक्षण संस्था भारताच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC) मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत असल्याचे तपासण्यात आले आहे.
परदेशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेल्या FMGE (Foreign Medical Graduate Examination) संदर्भातील प्रक्रियेचीही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तिमोर लेस्टेमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर स्थानिक भाषेतील स्वतंत्र वैद्यकीय परवाना परीक्षा द्यावी लागत नसल्याचा दावा संस्थेने यावेळी केला.
दरम्यान, श्रद्धा इन्स्टिट्यूटचे चेअरमन ए. आर. तांबे यांनी तिमोर लेस्टेचे उपपंतप्रधान मारियानो अस्सानामी सबीनो, आंतरराष्ट्रीय शिक्षण, स्वास्थ्य व ग्रामीण विकास सल्लागार डॉ. राजा थांगप्पन तसेच UCTच्या अॅकॅडमिक डायरेक्टर कंचना यांची भेट घेऊन वैद्यकीय शिक्षण आणि शैक्षणिक सहकार्याबाबत चर्चा केली होती. या माध्यमातून भारत आणि तिमोर लेस्टे यांच्यातील शैक्षणिक सहकार्याला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आल्याचे संस्थेने सांगितले.
विद्यार्थ्यांना परदेशात वैद्यकीय शिक्षण घेताना योग्य महाविद्यालय, मान्यता, अभ्यासक्रम, भारतातील परतल्यानंतरची पात्रता व परवाना प्रक्रिया यांची अधिकृतरीत्या पडताळणी करूनच प्रवेश घेण्याचे आवाहनही करण्यात आले.यावेळी अनुज गोयल,अभिषेक तांबे उपस्थित होते.
कार्लीटो न्यून्स यांचा सन्मान करताना ए आर तांबे सर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





