‘२२ कोटींच्या कचरा संकलन निविदेत तब्बल ₹७.७३ कोटींची अनावश्यक वाढ’; उच्च न्यायालयात जाणार – उदयसिंग पाटील
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत मंजूर झालेल्या सुमारे २२ कोटींच्या कचरा संकलनाच्या अंदाजपत्रकात तब्बल ७ कोटी ७३ लाखांची अनावश्यक वाढ करण्यात आल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी केला. या कथित अनियमिततेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
उदयसिंग पाटील यांनी अंदाजपत्रकाचे विश्लेषण करताना अनेक बाबींवर आक्षेप नोंदवले. त्यांच्या मते ८८ मदतनीस अतिरिक्त दाखवून सुमारे २.१८ कोटींचा भार टाकण्यात आला आहे. मागील अंदाजपत्रकात कचरा संकलनाचा खर्च वार्षिक ७.३४ कोटी असताना यावर्षी तो सुमारे १४ कोटी दाखविण्यात आला आहे. याशिवाय डिझेल खर्चासाठी ८० लाखांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली असून, गमबूट, फेस मास्क, हातमोजे आदी विविध बाबींमध्येही लाखो रुपयांची वाढ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
पावसाळ्यापूर्वी साफ होणाऱ्या सारण गटारींच्या स्वच्छतेसाठी मागील वर्षी २ लाखाचा खर्च झाला असताना यंदा तब्बल ९७ लाखांची तरतूद करण्यात आल्याने सुमारे ९५ लाखांची अनावश्यक वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच कचऱ्याचे केंद्रीकरण, शहापूर खाणीतील विल्हेवाट, झाडे तोडणे, कर्मचारी पुरवठा, सॅनिटरी प्रोसेसिंग मशिन, आकस्मिक निधी, कंत्राटदाराचा नफा आणि कचरा विल्हेवाट या विविध बाबींमध्येही मोठ्या प्रमाणात वाढीव खर्च दाखविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मक्तेदाराला २०२६ च्या डीएसआरनुसार दर दिले जात असताना, महापालिकेकडून वाहनांचे भाडे मात्र २०२१ च्या डीएसआरनुसारच वसूल केले जात असल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या कथित अनियमिततेमुळे मंजूर झालेले अंदाजपत्रक आणि संबंधित महासभा बेकायदेशीर असल्याचा दावा करत याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे उदयसिंग पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी नगरसेवक परवेज गैबान,शिवाजी पाटील, सयाजी चव्हाण, अमरजीत जाधव, नंदकुमार पाटील,सचिन राणे तसेच रतन वाझे, वाजीद तासगावे आणि नितीन कोकणे उपस्थित होते.
रस्तेकामात पाणी निचऱ्याची सोय नाही-परवेज गैबान
इचलकरंजी शहरात महासत्ता चौक ते आंबेडकर पुतळा हा सिमेंट काँक्रिट रस्ता सुरू असून यामध्ये पाणी निचरा व्यवस्था करण्यात आली नसून भविष्यात कोणतेही गळतीचे वगैरे काम निघाल्यास रस्ताच उकरावा लागणार आहे हा मुद्दा नगरसेवक परवेज गैबान यांनी मांडला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






