ICHMH51NEWS.IN
9921600800

कबनूरमध्ये पिस्तुलाचा थरार! स्वतःच्याच हाताने सुटली गोळी; तरुण गंभीर जखमी विनापरवाना पिस्तूल बाळगून निष्काळजीपणे हाताळल्याने दुर्घटना; पोलिसांकडून गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कबनूरमध्ये पिस्तुलाचा थरार! स्वतःच्याच हाताने सुटली गोळी; तरुण गंभीर जखमी

विनापरवाना पिस्तूल बाळगून निष्काळजीपणे हाताळल्याने दुर्घटना; पोलिसांकडून गुन्हा दाखल

इचलकरंजी : कबनूर येथील साईनगर परिसरात विनापरवाना पिस्तूल बाळगून त्याच्याशी खेळणे एका २० वर्षीय तरुणाच्या चांगलेच अंगलट आले. पिस्तूल निष्काळजीपणे हाताळताना अचानक गोळी सुटून तरुणाच्या हातातून आरपार गेली आणि डोक्यात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

निलेश निशिकांत कांबळे (वय २०, रा. कोल्हापूर रोड, साईनगर, कबनूर, ता. हातकणंगले) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना ७ ऑगस्ट रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास शुभम दीपक सूर्यवंशी याच्या घराजवळील मोकळ्या जागेत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे हा त्याचा मित्र शुभम सूर्यवंशी याच्या तवेरा गाडीच्या मागील सीटवर बसला होता. त्याच्याकडे विनापरवाना पिस्तूल होते. ते निष्काळजीपणे हाताळत असताना अचानक त्यातून जिवंत राऊंड फायर झाला. गोळी कांबळेच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटातून आरपार गेली आणि त्याच्या डाव्या कानाच्या मागील बाजूस डोक्यात घुसली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला.

जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल होताना त्याने दुखापत कशी झाली याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. वाहनावरून येताना दुखापत झाल्याचे सांगून पिस्तुलातून गोळी सुटल्याची खरी माहिती लपविण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी पिस्तूल आणि एक जिवंत राऊंड ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपक आनंदा माने यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक मेमाने आणि पोलीस उपनिरीक्षक साने यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साने करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा