गणेशमूर्ती विक्रेत्यांसाठी लायन्स ब्लड बँकेसमोरील जागा, पूजेचे व रक्षाबंधन साहित्य विक्रीसाठी वेद भवन
इचलकरंजी : शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे कायमस्वरूपी हटविण्याची कार्यवाही महानगरपालिकेने सुरू केली असून, गणेशोत्सव व रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महानगरपालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत.
गणेशमूर्ती विक्रेत्यांसाठी लायन्स ब्लड बँकेसमोरील जागा, तर गणेशोत्सवाशी संबंधित विविध साहित्य तसेच रक्षाबंधनाचे साहित्य विक्रीसाठी वेद भवन येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित व्यापाऱ्यांशी चर्चा व विचारविनिमय करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्य रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत राहावी, नागरिकांना अतिक्रमणामुळे होणारा त्रास टाळता यावा आणि सण-उत्सवाशी संबंधित विक्रेत्यांनाही व्यवसायासाठी योग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने पर्यायी जागांची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागरिकांनी गणेशोत्सव व रक्षाबंधनासाठी आवश्यक साहित्य खरेदी करताना या पर्यायी जागांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि महानगरपालिकेच्या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर उदय धातुंडे यांनी केले.
सण-उत्सव आनंदात, सुरक्षिततेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरे करण्यासाठी नागरिक, व्यापारी आणि महानगरपालिका प्रशासन यांनी परस्पर सहकार्य करावे, असेही महापौरांनी सांगितले.
यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, सभागृह नेते विठ्ठल चोपडे, नगरसेवक सुशांत कलागते तसेच शहरातील विविध व्यापारी उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







