इचलकरंजीत २८ ते ३० अखेर अरिहंत व्याख्यानमाला
येथील सकल दिगंबर जैन समाज, लायन्स क्लब, रोटरी क्लब व रोटरी एक्झिक्यूटिव्ह यांच्या संयुक्त संयोजनातून पर्युषण पर्वानिमित्त अरिहंत व्याख्यानमाला २०२६ आयोजित केली आहे. दि. २८, २९ व ३० सप्टेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता लायन्स क्लब बँक, दाते मळा, इचलकरंजी येथे ही व्याख्यानमाला होणार आहे. अरिहंत व्याख्यानमालेचे ९ वे वर्ष असून याचे आयोजन इचलकरंजीतील दिगंबर जैन समाजाची सर्व मंदीरे व भ.महावीर जयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने केले जात आहे.
व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी सोमवार २८ रोजी कुंडल येथील व्याख्याते जयवंत आवटे यांचे व्याख्यान होणार असून, त्यांचा विषय जाऊ आनंदाच्या गावा असा आहे. मंगळवार २९ रोजी ज्येष्ठ संपादक व विचारवंत संजय आवटे, पुणे यांचे आम्ही भारताचे लोक यावर व्याख्यान होणार आहे. बुधवार ३० रोजी प्रेरक वक्ते इंद्रजीत देशमुख हे ताणतणाव रहित कुटुंब व्यवस्था यावर मार्गदर्शन करणार आहेत.
सदरच्या व्याख्यानमालेस कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि., श्री आदिनाथ को-ऑप बँक लि., सन्मती सहकारी बँक लि., श्री वर्धमान नागरी सहकारी पत संस्था मर्या., चौगुले स्विट मार्ट अँड डेअरी, श्री लक्ष्मी सहकारी औद्योगिक वसाहत लि., दि इचलकरंजी इंडस्ट्रियल को-ऑप. इस्टेट लि., व माणिक हार्डवेअर प्रा.लि. यांचे प्रायोजकत्व लाभलेले आहे.
पर्युषण पर्वाच्या निमित्ताने आयोजित या व्याख्यानमालेत नामवंत विचारवंतांच्या वैचारिक मार्गदर्शनाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन चंद्रकांत पाटील, सुरेश रोजे, तीर्थंकर माणगांवे, संजय मगदूम, मोहन चौगुले, विजय गिरमल व अनिल बमन्नावर यांनी केले आहे. व्याख्यानमाला सर्व धर्मीयांसाठी खुली आहे.






