ICHMH51NEWS.IN
9921600800

शासकीय नियमांची माहिती नागरिकांनी करून घेणे आवश्यक- विवेक वेलणकर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शासकीय नियमांची माहिती नागरिकांनी करून घेणे आवश्यक- विवेक वेलणकर

इचलकरंजी-
“आज नागरिकांच्या समोर असलेले विविध प्रश्न आणि समस्या पाहताना असे लक्षात येते की सर्वसामान्य नागरिकांना सरकारी व निमसरकारी नियमांची माहिती नसते त्यामुळे या शासकीय व्यवस्थेकडून अन्याय आणि मनस्ताप सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणजे विविध प्रकारच्या शासकीय नियमांची माहिती नागरिकांनी करून घ्यायला हवी, त्याचबरोबर आपल्याला सेवा देणाऱ्या अशा प्रकारच्या संस्थांच्यावर लक्ष ठेवणारा दबाव गट आपण निर्माण करायला हवा” अशा आशयाचे प्रतिपादन ग्राहक हक्क आणि माहिती अधिकार मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी केले. येथील मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत दुसऱ्या दिवशी ‘नागरिक हो सजग व्हा’ या विषयावर ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त शामसुंदर मर्दा, रोटरी क्लब सेंट्रलचे सेक्रेटरी नागेश दिवटे आणि मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे तसेच व्याख्याते वेलणकर यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी कपिल पिसे यांनी स्वागत व प्रस्तावित केले तर सौ. शर्वरी गोवंडे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.
“वीज मंडळ, महापालिका, बँका, विमा कंपन्या, टेलिफोन व मोबाईल, वाहतूक टोल याबाबतचे शासकीय नियम जाणून घेतले तर सर्वसामान्य ग्राहक आपले अधिकार मिळवू शकतात. त्याकरता माहिती अधिकार कायदा, ग्राहक संरक्षण कायदा, सेवा हमी कायदा यांची माहिती नागरिकांनी करून घ्यावी कारण या शासकीय संस्थांच्याकडून चूक झाली तर ग्राहकांनाही भरपाई मिळण्याचे नियम आहेत. मात्र असे विविध नियम नागरिकांना शासकीय व्यवस्थेकडून माहिती करून दिले जात नाहीत, त्यामुळे अशी माहिती करून घेणे हे नागरिकांच्या सजगतेचे लक्षण आहे.” अशा आशयाची माहिती त्यांनी दिली.
आपल्या माहितीपूर्ण भाषणात वेलणकर यांनी अशा सर्व घटकांच्या कामकाजाबद्दल आणि अडचणींबद्दल विवेचन केले. एमएसईबी, बँका, टोल या ठिकाणी होणाऱ्या गैरव्यवहारावर त्यांनी परखड टीका केली. “ग्राहकांच्या तक्रारीची वेळेवर दखल घेतली नाही आणि दुरुस्ती केली नाही तर एमएसईबी कडून भरपाई मिळू शकते, बँकेत किमान शिल्लक नियम असला तरी कधीही त्यावर वजा दंड लावता येत नाही, या देशातील सर्वात मोठा झोल म्हणजे टोल व्यवस्था आहे या माध्यमातून होणारा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे, स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक बँकांच्याकडून २०१२ ते २०१९ या काळात जवळजवळ सव्वा लाख कोटी रुपयांची कर्जे राईटऑफ केलेली आहेत आणि त्यापोटी फक्त आठ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत ही एक प्रकारे सर्वसामान्य बॅंक ग्राहकांची फसवणूक आहे” अशी विविध प्रकारची माहिती त्यांनी यावेळी दिली.
आपल्या व्याख्यानाचा समारोप करताना त्यांनी “नागरिकांनी सर्व शासकीय निमशासकीय ठिकाणी, नियमाप्रमाणे असेल तर आपले काम का होत नाही, कसे होत नाही असे प्रश्न विचारले पाहिजेत. आज मसल पॉवर, मनी पॉवर आणि नॉलेज पॉवर आहे त्यांचीच कामे होऊ शकतात, इतरांची नाही. त्यामुळे नागरिकांनी नॉलेज पॉवर मिळवून त्या योग्य मार्गाने वाटचाल करायला हवी” अशा आशयाचे आवाहन केले येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहामध्ये सदरचे व्याख्यान पार पडले.
मनोरंजन व्याख्यानमालेत ग्राहकांच्या हक्काबाबत बोलताना विवेक वेलणकर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा