आपल्या पैशाची सुरक्षितता ही आपलीच जबाबदारी असते- डॉ. अपूर्वा जोशी, पुणे
इचलकरंजी:
“आजच्या धावपळीच्या युगात सर्वांनी आपल्या आर्थिक गुंतवणुकीबद्दल जागरूक राहिली पाहिजे. चीट फंड, बिटकॉइन, क्विक मनी, जास्ती व्याज, अशा गोष्टी विश्वासार्ह नाहीत. कमी श्रमात अधिक पैसे मिळविण्याची अपेक्षा करू नये कारण त्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते. आपल्या पैशाची सुरक्षितता ही आपलीच जबाबदारी आहे याचे भान आपण ठेवायला हवे” अशा आशयाचे उदगार फॉरेन्सिक ऑडिटर डॉ. अपूर्वा जोशी, पुणे यांनी काढले. येथील मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत सहाव्या दिवशी त्या बोलत होत्या.
‘आर्थिक गुन्हे व घोटाळे, सावधगिरी आणि उपाय’ या विषयावर मुलाखत स्वरूपात डॉ. जोशी यांनी माहिती दिली. आपल्या भाषणात त्यांनी हर्षद मेहता, केतन पारेख, नीरव मोदी, मेहूल चोक्सी, सत्यम कॉम्प्युटर, आयएल अँड एफएस अशा घोटाळेबाज व्यक्ती आणि कंपन्यांचा थोडक्यात आढावा घेतला. हे आर्थिक घोटाळे कशाप्रकारे घडतात, त्यांचे सूत्रधार कसे सापडतात, असे आर्थिक गुन्ह्यांचे गुंतागुंतीचे जग श्रोत्यांना समजेल अशा प्रकारे उलगडून दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. सुरुवातीला श्यामसुंदर मर्दा यांच्या हस्ते पाहुणे आणि वक्त्यांना गुलाब पुष्प प्रदान करण्यात आले. यावेळी गुरुकुल शिक्षण समूहाचे संचालक तात्या हिंगणगावे यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर अतुल शहा उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन संजय होगाडे यांनी केले. समीर गोवंडे यांनी जोशी यांची मुलाखत घेतली.
कार्यक्रमात आर्थिक घोटाळ्यांच्या बद्दल बोलताना डॉ. जोशी यांनी “मनुष्य हा बरेचदा पैशाचा लोभी असतो त्यामुळे तसेच हाव आणि लोभीपणा यामुळे असे घोटाळे होत राहतात. कंपनीच्या माध्यमातून घोटाळे करताना शेअर्सचे भाव वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रवर्तक आणि कर्मचारी संगनमत करतात त्याचबरोबर अनेकदा बँकेचे कर्मचारी व अधिकारी तसेच काही वेळा लेखा परीक्षक देखील यात सहभागी असतात” अशी माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर या संबंधीची प्रत्यक्ष आपल्याकडे घडलेली काही उदाहरणेही त्यांनी सांगितली. अनेकदा मोठ्या घोटाळ्यांमध्ये गुन्हेगारांबरोबरच बँक अधिकारी, शासकीय यंत्रणा, कर्मचारी व अधिकारी यांचाही सहभाग असतो. अशावेळी खूप जबाबदारीने फॉरेन्सिक अकाउंटंट या नात्याने काम करावे लागते” असे त्या म्हणाल्या.
आपल्या भाषणात आर्थिक सावधगिरी बद्दल बोलताना डॉ. जोशी यांनी “सर्वसामान्य नागरिकांनी आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते अशा प्रकारचा डेटा कुणालाही सहजपणे देऊ नये. नियमाप्रमाणे आवश्यक असेल तरच हा डेटा द्यावा कारण याचा दुरुपयोग करून आर्थिक, सायबर घोटाळे केले जातात. असे घोटाळे करणारे आपल्यापेक्षा आणि आपल्या तपास यंत्रणेपेक्षा चलाख असल्याने सहजासहजी त्यांचा तपास लागत नाही. शिवाय असे गुन्हेगार बऱ्याचदा परदेशात असतात आणि इथल्या कुणाचातरी वापर करून ते पैसे मिळवत असतात. आपण मोबाईलचा वापर करतानाही आवश्यक तितकीच ॲप वापरावीत. प्रत्येक ॲपला सर्व परमिशन आपण देतो, ती देऊ नयेत कारण त्यामुळेही गैरव्यवहार होऊ शकतात” असे सांगितले.
“एकूणच आपल्याकडे भ्रष्टाचार, आर्थिक फसवणूक व गुन्हे यांची कीड सर्व क्षेत्रात पसरलेली असल्याने आपण नोकरदार असो वा गृहिणी, छोटे व्यवसायिक असो वा उद्योगपती, सर्वांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. कोणी आपल्याला फसवत नाही हे पाहण्याबरोबरच आपल्या हातूनही कळत न कळत एखादा आर्थिक अपघात होत नाही अथवा कायदेशीर प्रक्रियांचे पालन नीटपणे होत आहे की नाही हे पाहणेदेखील जरुरीचे आहे. मोबाईलवरील मेसेज अधिकृत आहेत की नाही ते तपासून बघणे आणि मग त्याबाबत कार्यवाही करणे आवश्यक आहे. तरीही आपल्याबाबतीत काही सायबर क्राईम झाल्यास चक्षु ॲप, १९३० नंबर यावर तक्रार करणे, अशी काळजी आपण घ्यावी.” अशा आशयाचे मार्गदर्शन जोशी यांनी केले. शेवटी श्रोत्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना त्यांनी माहितीपूर्ण उत्तरे त्यांनी दिली. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमास इचलकरंजी व परिसरातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत बोलताना अपूर्वा जोशी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







