ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीला लवकरच  पाणी देऊ,जीएसटी परतावा २ महिन्यात देणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीला लवकरच  पाणी देऊ,जीएसटी परतावा २ महिन्यात देणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

इचलकरंजी
इचलकरंजी शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आमचे प्राधान्य असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल,कुठे पाणी नसेल तर कुठूनही शोधून पाणी दिले जाईल त्याच बरोबर जीएसटी परतावा दोन महिन्यात इचलकरंजी शहराला दिला जाईल अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजी येथील भाजपा विकासपर्व  मेळाव्यात केली.
इचलकरंजीकरांना भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, वस्त्रोद्योगाचा वीजेचा प्रश्‍न आणि महानगरपालिकेचे जीएसटी अनुदान हे सर्व प्रश्‍न नजीकच्या काळात निश्‍चितपणे मार्गी लावले जातील, अशी ग्वाही देतानाच आमदार राहुल आवाडे हे सातत्याने पाणी प्रश्‍नासाठी पाठपुरावा करत असून ते इचलकरंजीकरांना पाणी देणारच अन् नसेल तर आपण शोधून काढू,  असा विश्‍वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  व्यक्त केला.
७०० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा शुभारंभ आणि त्यानिमित्ताने येथील केएटीपी ग्राऊंडवर आयोजित विकास पर्व महासभेत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे मंगल कलश देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. तसेच कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि दत्ताजीराव कदम टेक्स्टाईल इन्स्टिट्युट (डीकेटीई) यांच्या माध्यमातून साकारण्यात येणार्‍या शेतीसाठी उपयुक्त एआय तंत्रज्ञानाच्या प्रोजेक्ट अटल प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी, गत सहा महिन्यात राज्य सरकारने पारदर्शी कारभारासाठी १०० दिवसांचा कार्यक्रम राबविताना सर्व कार्यालये गतिमान करण्यासह लोकाभिमुख केली. आता पुन्हा तीन टप्प्यात १५० दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. विकसित महाराष्ट्र २०४७ अंतर्गत २०२९ पर्यत उद्दीष्टांचा आराखडा केला जाईल. तर २०३५ मध्ये राज्याला व जनतेला काय देणार हे निश्‍चित करुन त्यातून विकसित महाराष्ट्र निर्माण केला जाईल. तर इ गव्हर्नेसच्या माध्यमातून राज्य सरकार व त्याची विविधांगे यातून ऑनलाईन सेवा पुरविली जाईल. त्याच माध्यमातून पुढच्या टप्प्यात आवश्यक ते सर्व दाखले हे नागरिकाच्या व्हॉटस्अपद्वारे मिळण्याची सुविधा दिली जाईल. महापूरामुळे सातत्याने भयानक परिस्थिती निर्माण होत असून तो सोडविण्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून पुराचे पाणी दुष्काळी भागात वळविण्याचा प्रकल्प तयार केला आहे. परंतु मधील अडीच वर्षाच्या काळात तो रेंगाळला होता. आता तो पुन्हा गतीमान देत या प्रकल्पाचे टेंडर या १५ दिवसात काढले जाईल. त्यातून पूराची समस्या दूर होण्यास मदत होईल. त्याचबरोबर महापूरासाठी कारणीभूत ठरणार्‍या अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला राज्य सरकारचा विरोधच आहे. त्यामध्ये आम्ही मागे हटणार नाही असे सांगत प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाऊ असे ते म्हणाले. शिवाय पूराचे पाणी दुष्काळी भागात वळविण्याचा प्रकल्प झाल्यास अलमट्टीचा धोकाच उरणार नाही.राज्यात तब्बल  १५० टीएमसी पाणी हे समुद्रात मिसळते. तेच पाणी वळविल्यास अर्ध्या महाराष्ट्रातील दुष्काळ दूर होईल, असेही त्यांनी सांगितले.
एकिकडे जादा पाण्याचा प्रश्‍न असताना दुसरीकडे वस्त्रनगरी पाण्यापासून वंचित असल्याचा उल्लेख करताना पाणी संदर्भात आमदार राहुल आवाडे हे सातत्याने माझ्याकडे पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तपासल्या जात असून कोणताही विरोध होणार नाही ते पाहून निर्णय घेऊ, असे सांगत इचलकरंजीला पाणी देणारच अन् नाही मिळाले तर शोधून काढू पण पाण्याचा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावू अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर इचलकरंजी महानगरपालिकेच्या जीएसटी अनुदान कसे देता येईल याचा आढावा घेतला जात असून येत्या दोन महिन्यात हा प्रश्‍न मार्गी लावला जाईल. वस्त्रनगरीला वीज आणि वीजेचे दर अशा अडचणीतून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यासाठी सोलर योजना राबवून त्याद्वारे पुढील २५ वर्षे वीजेचा दर एकच राहिल आणि वस्त्रोद्योग अडचणीतून बाहेर पडेल आणि एक्स्पोर्ट सिटी बनेल यासाठी सोलर सिटीचाही लवकरच निर्णय होईल, असे सांगत सरकार तुमचे असून काळजी करु नका असा सल्लाही त्यांनी दिला.
आमदार राहुल आवाडे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात गत सहा महिन्यात आपण केलेल्या विकासकामांचा आढावा घेतानाच तहानलेल्या वस्त्रनगरीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न योग्य तो निर्णय घेऊन कायमस्वरुपी सोडवावा, वस्त्रनगरीतील वस्त्रोद्योगाला भेडसावणारा वीज आणि दराचा प्रश्‍न संपुष्टात येण्यासाठी इचलकरंजीला सोलर सिटी बनवावे, कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी धोकादायक असलेल्या महापूराचा प्रश्‍न संपुष्टात येण्यासाठी अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला विरोध दर्शवावा आदी मागण्या करतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत स्वबळावर लढण्याची परवानगी द्यावी असे सांगत प्रामाणिकपणे राबणार्‍या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासह पहिला महापौर हा भाजपाचा असेल अशी ग्वाही दिली.
भाजपा प्रदेशउपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी, दिला शब्द पाळणारा असा मुख्यमंत्री असून अवघ्या सहा महिन्यातच तिबल इंजिन सरकारची ताकद इचलकरंजीतील विकासकामांच्या माध्यमातून दाखवून दिली आहे. सहा महिन्यात ७०० कोटीचा निधी आणून राहुलने विकासगंगा आणत माझ्या आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनाही मागे टाकले आहे. सतत भेडसावणारा वीजेचा प्रश्‍न कायमस्वरुपी संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्राला सोलरचे राज्य बनवावे. तर इचलकरंजीचा पहिला महापौर हा भाजपाचा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून भाजपाला एक नंबरची पार्टी करण्यासाठी जीवाचे रान करुया. कोल्हापूर जिल्ह्यात सगळीकडे कमळ फुलवूया असे आवाहन केले.
माजी वस्त्राद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी, इचलकरंजीला सातत्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सतावत असून शासनाने मंजूर केलेल्या सुळकूड उद्भव दुधगंगा योजनेला विरोध होत असल्याने ती थांबली आहे. कोणताही वाद अथवा विरोध होणार नाही यावर तोडगा असल्याचे सांगत रेंदाळपर्यंत आलेल्या कालव्यातून दुधगंगेचेच पाणी इचलकरंजीसाठी येणार आहे. त्यामुळे हा तोडगा मान्य करुन पाणी प्रश्‍न सोडवावा अशी मागणी करत विरोधाला चाप लावण्याची गरज असल्याचे सांगत मुख्यमंत्री सर्वच प्रश्‍न सोडवतील असे सांगितले. इचलकरंजीला सोलर सिटी करा म्हणजे इचलकरंजी एक्स्पोर्टचे जगातील पहिल्या क्रमांकाचे शहर बनेल अशीही मागणी केली.
याप्रसंगी व्यासपीठावर सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडीक, मकरंद देशपांडे, आमदार शिवाजी पाटील, विजय जाधव, नाथाजी पाटील, रवी आवाडे, महेश जाधव, अशोक स्वामी, स्वप्निल आवाडे, प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, अहमद मुजावर, सुनिल पाटील, बाबासो चौगुले, शेखर शहा, बाळासाहेब माने, श्रीरंग खवरे, मिश्रीलाल जाजू, महेश पाटील, सुभाष गोटखिंडे, तानाजी पोवार, जयवंत लायकर, सौ. मौश्मी आवाडे, नजमा शेख, सपना भिसे, अर्चना कुडचे, सीमा कमते, मंगल सुर्वे, सौ. अश्‍विनी कुबडगे, अनिल डाळ्या आदींसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी मानले. सूत्रसंचालक प्रा. युवराज मोहिते यांनी केले.
उपस्थित विराट जनसमुदाय
विकासपर्व मेळाव्यास उपस्थित जनसमुदायास हॅट उंचावून अभिवादन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खासदार धनंजय महाडिक,आ.राहुल आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे.सुरेश हाळवणकर
कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा