ICHMH51NEWS.IN
9921600800

कर्नाटकी बेंदूर निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कर्नाटकी बेंदूर निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

इचलकरंजी:
इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळ यांच्या वतीने सालाबादप्रमाणे कर्नाटक बेंदूर निमित्त शनिवार ७ जून आणि रविवार ८ जून रोजी डीकेटीई नारायण मळा पटांगणावर भव्य बैल पळविणे शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी लहान गटातील तर रविवारी मोठ्या गटातील शर्यती होणार आहेत, अशी माहिती बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते व उपाध्यक्ष नंदू पाटील यांनी दिली. तर सोमवार ९ जून रोजी सुट्टा बिनदाती बैल पळविण्याची शर्यत आणि मंगळवार १० जून रोजी नाट्यगृह चौक परिसरात जनावरांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच १२ जून रोजी पारंपारिक कर तोडणे व बक्षिस वितरणप्रसंगी इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे आणि चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

Advt

इचलकरंजी शहराचे अधिपती श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी सुरु केलेल्या  पारंपारिक लाकूड ओढण्याच्या शर्यतींना शतकोत्तर परंपरा आहे.१२० वर्षानंतरही ही परंपरा इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने अखंडीतपणे सुरु आहे. शनिवारी सकाळी ८ वाजता डीकेटीई नारायण मळा येथे लहान गटातील शर्यती होतील. शर्यतीचा शुभारंभ प्रगतशील शेतकरी संजय पाटील आणि रविवारी मोठ्या गटातील शर्यतीचा शुभारंभ प्रगतशील शेतकरी मुरलीधर कदम यांच्या हस्ते करण्यात येईल. अध्यक्षस्थानी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे असणार आहेत. लहान गटातील विजेत्या प्रथम क्रमांकास ७५ हजार रोख-शिल्ड व चांदीची फिरती गदा, द्वितीय क्रमांकास ५१ हजार रुपये व शिल्ड आणि तृतीय क्रमांकास ३१ हजार रुपये रोख आणि शिल्ड अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तर मोठ्या गटातील विजेत्या प्रथम क्रमांकास १ लाख रुपये रोख, शिल्ड आणि चांदीची फिरी गदा, द्वितीय क्रमांकास ७५ हजार रुपये व शिल्ड आणि तृतीय क्रमांकास ५१ हजार रुपये व शिल्ड अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. सोमवार ९ जून रोजी सुट्टा बिनदाती बैल पळविणे शर्यतीतील विजेत्यांना अनुक्रमे ११ हजार, ७ हजार आणि ५ हजार अशी बक्षिसे देण्यात येतील.
या सर्व शर्यतींचा बक्षिस वितरण सोहळा आणि कर तोडण्याचा कार्यक्रम गुरुवार १२ जून रोजी गावभागातील जुनी चावडी   म्हणजेच महादेव मंदिर चौक याठिकाणी होणार आहे. सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, शिवांशिष पाटील, देवाशिष पाटील आणि भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते बक्षिस वितरण होणार आहे. या शर्यती पाहण्यासाठी तसेच पारंपारिक कर तोडणे कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कलागते व पाटील यांनी केले आहे. यावेळी अहमद मुजावर, सागर मगदूम,  राहुल घाट, पापालाल मुजावर, आदित्य आवाडे, संपत जामदार, गजानन अब्दागिरे, सदाशिव कित्तुरे, शिवाजी माळी, शांताप्पा मगदूम आदी उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा