चेन स्नॅचिंग प्रकरणातील गुन्हेगार अटकेत, चार गुन्ह्यांचा उलगडा
इचलकरंजी
इचलकरंजी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील फरार आरोपी निखील सुभाष जगधने (वय २१, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) याला अटक केली आहे. या कारवाईमुळे इचलकरंजीसह जयसिंगपूर, शाहूपुरी (कोल्हापूर) व इस्लामपूर (सांगली) येथील चेन स्नॅचिंगच्या एकूण चार गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
दि. १७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.२५ वाजता इचलकरंजी सोलगे मळा परिसरात वृषाली शशिकांत जाधव यांच्याकडून मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी मिनी मंगळसूत्र (किंमत ७०,००० रुपये) हिसकावून चोरी केली होती. या प्रकरणी इचलकरंजी पोलिस ठाण्यात गु.र.नं. १२७/२०२५ भा.दं.वि. कलम ३०९(४), १२६(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Advt
तपासादरम्यान आधी आरोपी राजेंद्र उर्फ पप्पू भिमा चव्हाण यास सोलापूर गुन्हे शाखेने अटक केली होती. दुसरा आरोपी निखील जगधने फरार होता. मात्र, पोसई श्रीकांत वाघमारे, पो.हे.कॉ. अनिल पाटील व पो.कॉ. अमर शिरढोणे यांनी श्रीरामपूर परिसरात शोधमोहीम राबवत त्याला अटक केली.
तपासात निखील जगधने याने इतर तीन ठिकाणांवरील चेन स्नॅचिंगचे गुन्हे कबूल केले. त्याच्या माहितीवरून गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर 220 सीसी (लाल-काळी) मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







