ICHMH51NEWS.IN
9921600800

पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजीसह तीन औद्योगिक वसाहतींसाठी ६१० कोटींचे झेएलडी प्रकल्प मंजूर-आ.राहुल आवाडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजीसह तीन औद्योगिक वसाहतींसाठी ६१० कोटींचे झेएलडी प्रकल्प मंजूर-आ.राहुल आवाडे

इचलकरंजी –
पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजी, लक्ष्मी आणि पार्वती सहकारी औद्योगिक वसाहतींसाठी झेडएलडी तंत्रज्ञानावर आधारित नवीन सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (CETP) उभारण्याच्या ६१० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयाची माहिती आमदार राहुल आवाडे यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.

पंचगंगा नदी सातत्याने इचलकरंजी व परिसरातील प्रक्रिया उद्योग तसेच अन्य गावांतील सांडपाण्यामुळे प्रदूषित होत असून ही गंभीर समस्या रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला गेला आहे. शासनाने मंजूर केलेल्या या प्रस्तावात इचलकरंजी सहकारी औद्योगिक वसाहतीमधील १२ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रकल्प वाढवून १५ एमएलडी करण्यात येणार आहे. लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत ३ एमएलडी क्षमतेचा प्रकल्प वाढवून ५ एमएलडी केला जाईल, तर पार्वती औद्योगिक वसाहतीत (यड्राव, ता. शिरोळ) नवीन ५ एमएलडी क्षमतेचा झेडएलडी व सीईटीपी प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

Advt

या प्रकल्पासाठी उद्योग, वस्त्रोद्योग आणि पर्यावरण या तीन विभागांकडून अनुदान मंजूर झाले आहे. यामध्ये उद्योग विभागाकडून ५० टक्के ३००कोटी, तर वस्त्रोद्योग व पर्यावरण विभागाकडून प्रत्येकी २५ टक्के प्रत्येकी १५० कोटी इतके अनुदान दिले जाणार आहे. या प्रकल्पांची अंमलबजावणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (MIDC) सोपवण्यात आली आहे. ६०९.५८ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया काही काळ प्रलंबित होती, परंतु शासनाने त्याला अंतिम मंजुरी दिली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे व २ दिवसात कामाचे कार्यादेश देऊन येत्या दोन वर्षांत काम पूर्ण होणार आहे.

या निर्णयामुळे पंचगंगेतील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया होऊन नदी प्रदूषणात लक्षणीय घट होईल, असा विश्वास आमदार आवाडे यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, माजी मंत्री प्रकाश आवाडे व माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे यांनी यासाठी गेल्या काही वर्षांत सातत्याने पाठपुरावा केला होता. याअंतर्गत इचलकरंजीत यापूर्वी १२ एमएलडी क्षमतेचा सीईटीपी प्रकल्प यशस्वीरित्या उभारण्यात आला असून, त्यामुळे अनेक प्रक्रिया उद्योगांचे पुनरुज्जीवन झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इचलकरंजी दौऱ्यात या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला होता. यावेळी त्यांनी नदी प्रदूषणासंदर्भात गंभीर दखल घेतली होती. या निर्णयामुळे पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त होऊन शहरासह नदीकाठावरील ग्रामीण भागासाठीही उपयुक्त ठरणार आहे. याबद्दल आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे,पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व संबंधित मंत्र्यांचे आभार मानले.

कोल्हापूरातून येणारे सांडपाणी थांबवणार-आ.राहुल आवाडे.

इचलकरंजी शहराचा प्रश्न सुटला तरी कोल्हापूर येथून येणारे व थेट पंचगंगेत मिसळणारे प्रदूषित पाणी व सांडपाणी यावर ही माझे लक्ष असून ते ही येत्या वर्ष भरात पूर्णपणे थांबवणार असल्याचे आ.राहुल आवाडे यांनी सांगितले.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा