मजरेवाडी जॅकवेल ते जलशुद्धीकरण केंद्र दाबनलिका बदलण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची महाविकास आघाडीची आयुक्तांकडे मागणी
इचलकरंजी:
महाविकास आघाडी इचलकरंजी तर्फे आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत सुरू असलेले मजरेवाडी जॅकवेल ते जलशुद्धीकरण केंद्र दाबनलिका बदलण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Advt
या निवेदनात नमूद करण्यात आले की, सन २०२२-२३ मध्ये राज्य शासनाने मंजूर केलेल्या या योजनेंतर्गत मक्तेदार इलेकॉन एनर्जी यांना २० जून २०२३ रोजी कार्यादेश देण्यात आला होता. नऊ महिन्यांच्या मुदतीनंतर देखील अद्याप ५५०० मीटर पैकी फक्त ४२०० मीटर पाइपलाइनचे काम पूर्ण झाले असून उर्वरित १३०० मीटर पाइपलाइनचे काम रखडले आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेने चार वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही काम अपूर्णच राहिले आहे.
यासंदर्भात महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने १८ फेब्रुवारी २०२५ रोजी आयुक्तांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले होते, त्यावेळी पंधरा दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले गेले होते. मात्र त्यानंतरही कामात प्रगती झालेली नाही, असे त्यांनी नमूद केले.
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने अनेक भागांत नागरिकांना ४ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी मिळत आहे. काही ठिकाणी नळाला काळे पाणी येत असल्याचीही तक्रार आहे.
या निवेदनावर शशांक बावचकर, सागर चाळके, सयाजी चव्हाण, सदा मलाबादे, उदयसिंग पाटील आणि बाबासाहेब कोतवाल यांच्या सह्या आहेत.
महाविकास आघाडीने जलदगतीने या कामास अंतिम रूप द्यावे व नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा व्हावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
आयुक्त पल्लवी पाटील यांना निवेदन देताना शशांक बाबचकर,सागर चाळके,सयाजी चव्हाण,उदयसिंह पाटील
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







