एलटी-एचटी वीज दरवाढीचा औद्योगिक क्षेत्राला जबर धक्का!MERC च्या नव्या दररचनेमुळे पॉवरलूम व लघु-मध्यम उद्योगांची चिंता वाढली
इचलकरंजी:
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) १ जुलै २०२५ पासून लागू केलेल्या नव्या वीज दररचनेनुसार एलटी (LT) व एचटी (HT) औद्योगिक ग्राहकांसाठी दरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा लघु, मध्यम व पॉवरलूम उद्योगांवर प्रत्यक्ष आर्थिक परिणाम होणार असून कार्यक्षम उद्योगांनाही या निर्णयाचा फटका बसणार आहे.
एलटी औद्योगिक ग्राहकांसाठी मागणी शुल्क ₹३८८/kVA वरून ₹४००/kVA करण्यात आले असून ऊर्जा व वहन शुल्क एकत्रितपणे ₹८.२९/युनिटवरून वाढून ₹९.१५/युनिट झाले आहे. यामुळे प्रति युनिट ₹०.८६ वाढ झाली आहे. याशिवाय, बिलिंग स्वरूप kWh वरून kVAh मध्ये बदलल्याने पॉवर फॅक्टर कमी असणाऱ्या युनिट्सचे बिले अधिक वाढतील.
पूर्वी लागू असलेले ३.५% पॉवर फॅक्टर लाभ (इन्सेन्टिव्ह) मागे घेतल्यामुळे कार्यक्षम कामकाज करणार्या उद्योगांनाही नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यासोबतच Time-of-Day (ToD) कालावधीत ₹०.३० ते ₹०.४० प्रति kVAh अतिरिक्त शुल्क लागू करण्यात आले आहे. वाढीव शुल्कांवर आता ७.५% वीज शुल्क आकारण्यात येणार असून हे सर्व बदल एकत्रितपणे उद्योगांवर आर्थिक बोजा टाकत आहेत.
Advt
HT उद्योगांसाठी मागणी शुल्क ₹५४९/kVA वरून ₹६००/kVA करण्यात आले आहे. ऊर्जा व वहन शुल्क पूर्वी ₹८.९६/युनिट होते, जे आता ₹९.४२/युनिट झाले आहे. ToD कालावधीत प्रति युनिट ₹०.४० ते ₹०.५० अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. यामुळे दिवसरात्र चालणारे युनिट्स आणि शिफ्टमध्ये चालणाऱ्या यंत्रणा अधिक प्रभावित होतील.
रूफटॉप सौर प्रकल्प सुरू असलेल्या उद्योगांवरही ToD वेळेतील असमतोल वापरामुळे अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. वाढीव दरांवर ७.५% वीज शुल्क लागू झाल्यामुळे उद्योगांच्या नफ्यावर थेट परिणाम होईल.
या बदलांविषयी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे सचिव श्री. जाविद मोमीन यांनी चिंता व्यक्त करत म्हटले आहे की, “या नव्या दररचनेमुळे लघु, मध्यम व उच्चदाब औद्योगिक ग्राहकांवर मोठा आर्थिक भार पडणार आहे. उत्पादन खर्च वाढल्यामुळे स्पर्धा क्षमतेवर परिणाम होईल, नवे गुंतवणूकदार महाराष्ट्रात यायला तयार होणार नाहीत, आणि बेरोजगारीतही वाढ होण्याची शक्यता आहे. शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी आमची महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे सचिव जाविद मोमीन यांनी केली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







