इचलकरंजी परिक्षेत्राच्या कामामध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन, महावितरणचे स्वप्निल काटकर यांचे आश्वासन,पॉवरलूम असोसिएशनमध्ये सत्कार
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कोल्हापूर डिव्हीजनचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर, अधिक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत इचलकरंजी विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रसाद अवघडे, सारंग हातोळकर, उप कार्यकारी अभियंता ग्रामीण सुनिल चौगुले, सहाय्यक अभियंता केतन पोवार, व्यवस्थापक सुनिल गोसावी हे उपस्थित होते.
ADvt
दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य अभियंता स्वप्निल काटकर व अधिक्षक अभियंता गणपत लटपटे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणेत आले. यानंतर अध्यक्ष पाटील यांनी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या आजपर्यंतच्या कार्याची माहिती देऊन महावितरण व पॉवरलुम असोसिएशन यांच्यातील यापूर्वीचे संबंध व सहकार्य अशाचप्रकारे आपल्याकडून पुढे चालू राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच यंत्रमागधारकांच्या वीज बिलात आलेली पोकळ थकबाकीवरील व्याज व दंड व्याजाची रक्कम कमी करणे, पुर्वीप्रमाणे मागेल त्याला मल्टीपार्टी व एकाच शेडमध्ये अनेक कनेक्शन मिळावे, मागेल त्याला त्वरीत वीज कनेक्शन, वारंवार वीज पुरवठा खंडीत होणे, नविन सबस्टेशन, सब स्टेशनची जागा मिळणेबाबत चर्चा, चंदूर फिडर व पार्वती औद्योगिक वसाहतीमधील प्रश्न, वेळोवेळी लागणारे सुटे भाग, इचलकरंजी व परिक्षेत्रासाठी २६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती, लॅडर व्हेईकल, तीन शिफटमध्ये कर्मचारी, स्मार्ट मिटर बसविल्यानंतर लोकांमध्ये असलेला असंतोष असे प्रश्न उपस्थित करून यामध्ये आपण स्वत: लक्ष घालून यावर कायम स्वरूपी तोडगा काढावा म्हणून विनंती केली.
यावेळी मुख्य अभियंता स्वप्निल काटकर व अधिक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी उपस्थित संचालक व यंत्रमागधारक यांनी मांडलेल्या विविध समस्यांचा अभ्यास करून वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून त्या प्राधान्याने दूर करून यंत्रमागधारक व महावितरण यांच्यातील संबंध जास्तीत जास्त दृढ करण्याचे प्रयत्न होतील. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांना हे विषय त्वरीत मार्गी लावण्याच्या सक्त सुचना दिल्या व इचलकरंजी सर्कलचे कल्चर बदलण्याचा गंभीर इशारा देऊन यापुढे इचलकरंजी परिक्षेत्राचे कामात सुधारणा झालेली दिसेल असे आश्वासन देऊन स्मार्ट मिटरबाबत प्रत्येक विभागात एक एक ठिकाणी स्मार्ट मिटर बरोबर रेग्युलर चालू मिटर बसवून दोन्हींच्या रिडींगबाबत महिन्या ते दोन महिन्यात शहानिशा करून ग्राहकांचा असणारा संभ्रम दुर केला जाईल असे आश्वासन दिले. यंत्रमागधारकांनी महावितरणला पूर्वीप्रमाणे सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सतीश कोष्टी, पांडूरंग सोलगे, सुभाष बलवान, दत्तात्रय टेके, किरण पोवार, राजाराम गिरी इ. उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







