ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीईमध्ये ‘मी राजवाडा बोलतोय’ ओपन हाऊस उपक्रमास विक्रमी प्रतिसाद २ हजारांहून अधिक विद्यार्थी-पालकांनी घेतला गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाचा अनुभव

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईमध्ये ‘मी राजवाडा बोलतोय’ ओपन हाऊस उपक्रमास विक्रमी प्रतिसाद
२ हजारांहून अधिक विद्यार्थी-पालकांनी घेतला गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाचा अनुभव

इचलकरंजी, ता. १३ : डीकेटीई टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मी राजवाडा बोलतोय’ या अभिनव ओपन हाऊस सेशन अ‍ॅट कॅम्पस उपक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या २ हजारांहून अधिक विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून संस्थेच्या शैक्षणिक परंपरा, आधुनिक सुविधा, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि करिअर संधींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संस्थेने कॅम्पसमध्ये १३ ठिकाणी कार्यक्रमाचे प्रक्षेपण आयोजित केले होते. कार्यक्रमाची सुरुवात माजी विद्यार्थी व पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. संचालिका डॉ. एल. एस. आडमुठे यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवड, कौशल्य विकास आणि जागतिक संधींबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मागील वर्षाच्या कटऑफ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमातील ‘मी राजवाडा बोलतोय’ या विशेष सत्रात डॉ. अश्विनी रायबागी यांनी डीकेटीईच्या शैक्षणिक उत्कृष्टता, संशोधन व नवोपक्रमांची माहिती प्रभावीपणे मांडली. माहितीपटाद्वारे आधुनिक प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्लेसमेंट संधींची माहिती देण्यात आली.

माजी विद्यार्थ्यांच्या अनुभव कथनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. तनीशा गुळवणी, सौरभ पाटील, महेश भिरंगी, वृषाली परबकर, तेजस भिडे, मृण्मयी जोशी व प्रेरणा सुतार यांनी आपल्या यशाचा प्रवास उलगडताना डीकेटीईने दिलेल्या शिक्षण व मार्गदर्शनाचा गौरव केला. पालक प्रतिनिधी सिदगोंडा पाटील यांनीही संस्थेच्या विद्यार्थी व पालकांशी असलेल्या बांधिलकीचे कौतुक केले.

प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. ए. के. घाटगे यांनी सीईटी प्रवेश प्रक्रिया, कॅप राउंड व प्रवेशातील महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले. तसेच ‘डीकेटीई कटऑफ ट्रॅकर’ अ‍ॅपची माहिती देण्यात आली.

यानंतर विद्यार्थी व पालकांसाठी कॅम्पसची मार्गदर्शित भेट आयोजित करण्यात आली. विविध विभाग, प्रयोगशाळा, आयडिया लॅब, स्टार्टअप कट्टा, ग्रंथालय व विद्यार्थी विकास उपक्रमांची माहिती घेत उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजीमंत्री प्रकाश आण्णा आवाडे, मानद सचिव प्रा. डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व विभागप्रमुखांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन सोशल डीन प्रा. एस. जी. कानिटकर यांनी केले.

 

डीकेटीईमध्ये आयोजित ‘मी राजवाडा बोलतोय’ ओपन हाऊस कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना अमेरिकास्थित माजी विद्यार्थी महेश भिरंगी व कार्यक्रमाला लाभलेली उत्स्फूर्त उपस्थिती.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा