रस्ते खोदाईची नवीन कामे तात्काळ बंद; पॅचवर्क युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे महापौरांचे आदेश
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील भुयारी गटार योजनेअंतर्गत अर्धवट राहिलेल्या रस्ते खोदाईमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत महापौरांनी संबंधित मक्तेदार एल.सी. कन्स्ट्रक्शन (गुजरात) यांच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक घेऊन नवीन रस्ते खोदाईची सर्व कामे तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. तसेच ज्या ठिकाणी खोदाई पूर्ण झाली आहे, तेथे पॅचवर्कची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
महापौरांनी प्रभाग क्रमांक १ ते १६ मधील रस्ते खोदाईची सविस्तर लेखी माहिती सॅनिटरी इन्स्पेक्टर व मुकादम यांच्याकडून मागवून घेतली. वेळेत माहिती सादर न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहरातील पॅचवर्कची कामे अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी शहराचे चार झोनमध्ये विभाजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र मक्तेदार नियुक्त करून कामे वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन स्थायी समिती सभापतींकडे सोपविण्यात आले आहे. या कामांचा समन्वय व दैनंदिन आढावा घेण्याची जबाबदारी उपमहापौरांकडे देण्यात आली आहे.
नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवणे हे महानगरपालिकेचे सर्वोच्च प्राधान्य असून, रस्ते खोदाई व पॅचवर्कमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या मक्तेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापौरांनी दिला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








