रोटरी क्लबतर्फे विसर्जन मिरवणुकीत १५ हजार कापसाचे बोळे वाटप
ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांच्या कानांचे संरक्षण करण्याचा उपक्रम
इचलकरंजी : गणेशोत्सवातील अनंत चतुर्दशीच्या दिवशी झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजेच्या मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांच्या कानांचे संरक्षण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने कापसाचे बोळे वाटप करण्यात आले.
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गांवर लहान मुले, महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे व ध्वनिक्षेपकांचा वापर होत असल्याने नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी रोटरी क्लबने हा उपक्रम राबविला.
या उपक्रमांतर्गत सुमारे १५ हजार कापसाचे बोळे नागरिकांना वितरित करण्यात आले. ध्वनी प्रदूषणापासून कानांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कापसाचे बोळे वाटप उपक्रमावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज कोठारी, सेक्रेटरी सुनील येळरुटे, प्रकाश गौड, शिवदास कित्तुरे, संजय घायतिडक, प्रमोद धुत्रे, अनिल भुतडा, सत्यनारायण धूत, राजाराम जाधव, मनीष मुनोत, राजू पाटील, सुनील सातपुते, सुजित मगदूम, उत्तम रुग्गे, सुरेश कराळे यांच्यासह रोटरी व क्रेडाईचे पदाधिकारी उपस्थित होते.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जनजागृती करणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.







