ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत महावीर जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; रथोत्सवात हजारो श्रावकांचा सहभाग,महिलांची लक्षणीय उपस्थिती

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत महावीर जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; रथोत्सवात हजारो श्रावकांचा सहभाग,महिलांची लक्षणीय उपस्थिती

इचलकरंजी : 
सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर यांचा २६२५ वा जन्मकल्याणक महोत्सव शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सोमवारी दिवसभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी काढण्यात आलेल्या भव्य रथोत्सव व मिरवणुकीत हजारो जैन श्रावक-श्राविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
इचलकरंजी शहरात सर्व पंथीय जैन बांधव एकत्र येऊन महावीर जन्मकल्याणक साजरा करण्याची ५१ वर्षांची परंपरा कायम राखली जात आहे. यावर्षीही प्रश्नमंजुषा, पाककला स्पर्धा, अष्टद्रव्य थाळी सजावट, रक्तदान शिबिर, भजन स्पर्धा, फ्लॉवर डेकोरेशन, प्रवचन आदी विविध कार्यक्रम पार पडले.
मुख्य कार्यक्रमांतर्गत सकाळी गावभाग येथील आदिनाथ जैन मंदिरातून प्रभात फेरी काढण्यात आली. गुजरी पेठ, कागवाडे मळा, राजवाडा चौक, शांतिनाथ मंदिर, थोरात चौक, बालाजी चौक, शाहू पुतळा मार्गे ही फेरी जैन बोर्डिंग येथील चंद्रप्रभू जैन मंदिरात पोहोचली. त्यानंतर ध्वजारोहण झाले. दिवसभर रक्तदान शिबिर, अन्नदान, वृद्धाश्रमास शिधावाटप तसेच टीबी रुग्णांना दूध-बिस्किटांचे वितरण करण्यात आले.
सायंकाळी सहा वाजता श्री १००८ भगवान महावीर रथोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला. जैन धर्मीय विषयांवर आधारित देखावा स्पर्धेत अनेक आकर्षक व प्रबोधनात्मक देखावे सादर करण्यात आले. गावभाग येथील जैन मंदिरातून सुरू झालेल्या मिरवणुकीत रथ, वाद्यपथके आणि विविध वेशभूषेतील महिला सहभागी झाल्या होत्या.
या सोहळ्यात माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच उत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिव उदय चौगुले व जैन समाजातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणूक नामदेव मैदान येथे विसर्जित करण्यात आली. यावेळी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
चौकट : महिलांचे झांजपथक व लेझीम पथक ठरले आकर्षण
रथोत्सव मिरवणुकीत महिलांच्या झांजपथक व लेझीम पथकाने विशेष लक्ष वेधले. पारंपरिक वेशभूषेत सादर केलेल्या तालबद्ध सादरीकरणामुळे नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
स्त्री भ्रूण हत्या रोखण्याचा संदेश
अ.भा.श्वे. स्थानकवासी जैन कॉन्फरन्स महिला शाखेच्या वतीने स्त्री भ्रूण हत्या रोखण्याबाबत प्रतिज्ञा करण्यात आली.
बक्षीस वितरण करताना पदाधिकारी,
खुल्या देखाव्यात महिलांचे झांजपथक आकर्षण ठरले
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा