कन्या महाविद्यालयात सीडबॉल निर्मिती कार्यशाळा संपन्न
इचलकरंजी
येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयामार्फत आयोजित आगामी ३ आणि ४ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या ‘पन्हाळा ते पावनखिंड’ या मोहिमेमध्ये पर्यावरण जतन आणि संवर्धनाचा एक छोटा प्रयत्न म्हणून देशी बियांपासून सीडबॉल निर्मितीची कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना आणि गृहविज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
यावेळी डी. के. ए. एस. सी. महाविद्यालय, इचलकरंजीचे वनस्पतीशास्त्र विभागातील सहा. प्राध्यापक डॉ. संदीप गावडे यांनी सीडबॉलचा इतिहास सांगून त्याच्या निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट केली आणि सीडबॉल कसे तयार करावेत याचे प्रशिक्षण दिले. कार्यशाळेत प्रात्यक्षिकाद्वारे जवळपास 500 हून अधिक सीडबॉलची निर्मिती करण्यात आली.
महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ. श्रुती जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून पर्यावरण जतन आणि संवर्धनासाठी आपला खारीचा वाटा उचलण्याच्या दृष्टीने आणि देशी वाणाच्या झाडांची लागवड करण्यासाठी हा एक छोटा पण महत्त्वाचा प्रयोग आहे. पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक मोहिमेसोबतच पर्यावरण संवर्धनासाठीही अशा उपक्रमातून हातभार लागेल व दुहेरी हेतू साध्य होईल, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. एस. एस. सदस्य प्रा. स्वाती हाळवणकर यांनी केली. पाहुण्यांचा परिचय एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज शिंदे यांनी करून दिला तर गृहविज्ञान विभागप्रमुख प्रा. संगीता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंकुश कुरणे यांनी केले. या कार्यशाळेस एन. एस. एस. आणि गृहविज्ञान विभागाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
सिडबॉल निर्मिती प्रशिक्षण माहिती देताना डॉ संदीप गावडे व्यासपीठावर प्राचार्य डॉ श्रुती जोशी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





