ICHMH51NEWS.IN
9921600800

आयुक्तांच्या वागणुकीवर नगरसेवकांचा संताप; महापौरांकडे गाऱ्हाणे माफी न मागितल्यास महापालिकेच्या सभांवर बहिष्काराचा इशारा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आयुक्तांच्या वागणुकीवर नगरसेवकांचा संताप; महापौरांकडे गाऱ्हाणे

माफी न मागितल्यास महापालिकेच्या सभांवर बहिष्काराचा इशारा

इचलकरंजी :

इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या कथित वागणुकीवर नाराजी व्यक्त करत माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन व उदय बुगड यांच्या नेतृत्वाखाली महिला नगरसेविकांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी महापौर उदय धातूंडे यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांकडून लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याची तक्रार करत संबंधित प्रकाराबाबत माफी मागण्याची मागणी करण्यात आली.

शिष्टमंडळाने महापौरांसमोर मांडलेल्या निवेदनात शिक्षण समितीच्या सभापती विद्या साळुंखे यांना महासभेत अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच नगरसेविका विजया महाजन यांना तब्बल दीड तास ताटकळत ठेवण्यात आल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. रिंग रोडच्या रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, त्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी नगरसेविका रूपा बुगड यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन स्वीकारले जात नसल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला.

या घटनांमुळे नगरसेवकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, आयुक्तांनी महापौरांच्या उपस्थितीत संबंधित प्रकाराबाबत माफी मागावी व भविष्यात सर्व लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक दिली जाईल, याची हमी द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

दरम्यान, आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांनी आजारपणाचे कारण सांगत बैठकीस उपस्थित राहणे टाळल्याचे उपस्थितांनी सांगितले.

महापौर उदय धातूंडे यांनी उपस्थित नगरसेवकांशी चर्चा करून या प्रकरणी लवकरच बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी आयुक्तांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आपल्या भावना मांडल्या.

माफी न मागितल्यास सभांवर बहिष्काराचा इशारा

आयुक्तांनी लोकप्रतिनिधींशी झालेल्या कथित गैरवर्तनाबाबत जाहीर माफी मागावी, अशी एकमुखी मागणी उपस्थित नगरसेवकांनी केली. भविष्यात नगरसेवकांना सन्मानाची वागणूक दिली जाईल, याची स्पष्ट हमी देण्यात यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. अन्यथा महापालिकेच्या आगामी महासभा व विविध समित्यांच्या सभांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला. तसेच या विषयावर तातडीने तोडगा न निघाल्यास पुढील आंदोलनाची भूमिकाही स्वीकारली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा