इचलकरंजीतील विविध इंटरॅक्ट क्लबचे पदग्रहण संपन्न
इचलकरंजी दि.२९ जुलै-
“विद्यार्थीदशेत असताना मुलांनी जग समजून घेणे आवश्यक आहे. फक्त पुस्तकी शिक्षणाच्या पलिकडे जाऊन पर्यावरण, प्रदूषण समस्या तसेच नेतृत्वगुण, समानता, बंधुभाव अशा गोष्टींकडे लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांचा अधिक चांगला व्यक्तिमत्त्व विकास होऊ शकतो” अशा आशयाचे विचार रोटरी प्रांत ३१७२चे नियुक्त प्रांतपाल डॉ. सुहास जोशी यांनी व्यक्त केले. येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध इंटरॅक्ट क्लबच्या पदग्रहण समारंभाचे प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.
त्यापुर्वी डॉ. जोशी यांच्या हस्ते इंटरॅक्ट क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांना कॉलर आणि पीन प्रदान करून पदभार सोपविण्यात आला. याप्रसंगी प्रमुख उपस्थित सहाय्यक प्रांतपाल रोहीत शहा यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात शहरातील तात्यासाहेब मुसळे हायस्कूल, श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल, सरस्वती हायस्कूल, राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल, गोविंदराव हायस्कूल, डीकेटीई इचलकरंजी हायस्कूल, भारती हायस्कूल, दि न्यू हायस्कूल, ज्ञानबातात्या दत्तवाडे हायस्कूल, स्वामी विवेकानंद गर्ल्स हायस्कूल तसेच कबनूर हायस्कूल, कबनूर आणि जंबुकुमार हुल्ले विद्यामंदिर, रुई या सर्व हायस्कूलमधील इंटरॅक्ट क्लबचे नवीन अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना पदभार सोपविण्यात आला. यावेळी निवडक नवीन पदाधिकारी विद्यार्थ्यांनी तसेच इंटरॅक्ट शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष विमलकुमार बंब यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख डिस्ट्रिक्ट टीआरएफ चेअरमन प्रशांत कांबळे यांनी करून दिली. फोर वे टेस्टचे वाचन श्रीकांत राठी यांनी केले. कमिटी चेअरमन नितीनकुमार कस्तुरे आणि युथ सर्व्हिस डायरेक्टर लक्ष्मीकांत पटेल यांच्या हस्ते पाहुण्यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आली. शेवटी नियुक्त सेक्रेटरी सुभाष आक्कोळे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय होगाडे यांनी केले. येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात सदरचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रोटरी सदस्य, इंटरॅक्ट सदस्य आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंटरॅक्ट क्लबच्या पदग्रहण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. सुहास जोशी, इतर मान्यवर आणि नूतन पदाधिकारी विद्यार्थी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







