ICHMH51NEWS.IN
9921600800

देशातील १०० संस्थांमध्ये डीकेटीईचा 5G लॅब उपक्रमात द्वितीय क्रमांक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

देशातील १०० संस्थांमध्ये डीकेटीईचा 5G लॅब उपक्रमात द्वितीय क्रमांक

इचलकरंजी :
 इचलकरंजी येथील डीकेटीई टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटने भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या 5G युझ केस लॅब उपक्रमात देशातील १०० अग्रगण्य संस्थांमध्ये ‘ओव्हरऑल एक्सलन्स’ आणि ‘5G लॅब आउटपुट अँड इम्पॅक्ट एक्सलन्स’ या दोन्ही गटांत राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांच्या हस्ते डीकेटीईला हा सन्मान प्रदान करण्यात आला. देशातील आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी, केंद्रीय विद्यापीठे आणि इतर नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये झालेल्या स्पर्धेत डीकेटीईने संशोधन, उद्योग सहकार्य, तंत्रज्ञान विकास, बौद्धिक संपदा निर्मिती आणि नवोपक्रमांच्या व्यावसायिकीकरणात उल्लेखनीय कामगिरी केली.
संस्थेतील 5G लॅबचे उद्घाटन यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. या लॅबमुळे शेती, वस्त्रोद्योग, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळाली आहे. 5G आणि उदयोन्मुख 6G तंत्रज्ञानातील डीकेटीईच्या संशोधन क्षमतेची ही राष्ट्रीय स्तरावर दखल मानली जात आहे.
या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, डेप्युटी डायरेक्टर डॉ. यू. जे. पाटील, ईटीसी विभागप्रमुख प्रा. डॉ. जे. पी. खरात यांचे मार्गदर्शन लाभले. 5G लॅबचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. ए. आर. पाटील यांनी काम पाहिले.
“देशातील सर्वोच्च तांत्रिक संस्थांच्या स्पर्धेत मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान डीकेटीईच्या संशोधनकेंद्रित, उद्योगाभिमुख आणि नवोपक्रमप्रधान शैक्षणिक वाटचालीचा सुवर्ण अध्याय आहे. 5G, 6G आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान संशोधनात देशाचे नेतृत्व करण्याच्या दिशेने संस्थेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे,” असे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सांगितले.
दिल्ली येथे झालेल्या 5G लॅब पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांच्या हस्ते डीकेटीईचे प्रा. डॉ. जे. पी. खरात, डॉ. ए. डी. काडगे व डॉ. एस. आर. प्रसाद पुरस्कार स्वीकारताना
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा