खंडणीसाठी युवकाचे अपहरण; तिघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा
इचलकरंजी :
दारूचे बिल भरण्याच्या कारणावरून सुरुवातीला रु. १० हजारांची मागणी करून मारहाण केल्यानंतर, फिर्यादीच्या मुलाचे अपहरण करून रु. १ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नियाज सिकंदर नाईकवाडे (वय ३८, रा. अष्टविनायक नगर, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित स्वप्निल सुनील परीट (रा. ठाकरे चौक), आयुब अहमद अत्तार (रा. केटकाळे नगर) आणि अथर्व विजयकुमार कुलकर्णी (रा. शिक्षक कॉलनी, ठाकरे चौक) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, ८ जुलै रोजी रात्री सुमारे १० वाजता पंचगंगा कारखान्याजवळ स्वप्निल परीट याने फिर्यादी यांना अडवून दारूचे बिल भरायचे असल्याचे सांगत जबरदस्तीने रु. १० हजारांची मागणी केली तसेच मारहाण व शिवीगाळ केली.
त्यानंतर २८ जुलै रोजी दुपारी फिर्यादीचा मुलगा मुहम्मद कैफ हा कामावर जात असताना संजय फाउंड्रीजवळ तिन्ही आरोपींनी त्याला अडवून जबरदस्तीने वाहनात बसविले. त्यानंतर स्वामी अपार्टमेंट, जवाहरनगर येथे नेऊन “तुझ्या वडिलांनी रु. १ लाख दिले नाहीत तर तुला आणि तुझ्या वडिलांना ठार मारू,” अशी धमकी देत खंडणीची मागणी केली. तसेच त्याला मारहाण करून त्याचा मोबाईलही हिसकावून घेतल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, अतिरिक्त कार्यभार शिवाजीनगर पोलीस ठाणे, करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







