वस्त्रोद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी India ITME 2026 प्रदर्शनाला भेट द्या; अशोक स्वामी यांचे उद्योजकांना आवाहन
इचलकरंजी : वस्त्रोद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान, अद्ययावत यंत्रसामग्री आणि जागतिक बाजारपेठेतील संधींची माहिती मिळविण्यासाठी ४ ते ९ डिसेंबर २०२६ या कालावधीत ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) येथे India ITME 2026 या आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग यंत्रसामग्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह देशातील वस्त्रोद्योग उद्योजकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक म. स्वामी यांनी केले आहे.
या प्रदर्शनात सूतनिर्मिती, कापड विणकाम, प्रक्रिया, तयार कपडे निर्मिती यासह विविध क्षेत्रांतील आधुनिक यंत्रसामग्री व उत्पादन तंत्रज्ञानाचे सादरीकरण होणार आहे. उत्पादन खर्च कमी करणे, गुणवत्ता सुधारणे, ऊर्जा बचत आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त स्वयंचलित यंत्रणा व आधुनिक प्रणालींची माहिती उद्योजकांना मिळणार आहे.
तसेच देश-विदेशातील यंत्रसामग्री उत्पादक, तंत्रज्ञान प्रतिनिधी आणि व्यावसायिकांशी संपर्क साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे ५ व ६ डिसेंबर रोजी वस्त्रोद्योगाच्या भविष्यावर आधारित उद्योग परिषद होणार असून, उद्योजकांची परिषद, तांत्रिक पुरस्कार वितरण आणि व्यावसायिक संपर्क मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सहकारी व खासगी सूतगिरण्या, यंत्रमाग आणि कापड प्रक्रिया उद्योगातील उद्योजकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेऊन आपल्या उद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा, असे आवाहन स्वामी यांनी केले आहे.
प्रदर्शन स्थळ : भारतीय प्रदर्शन केंद्र, ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश. कालावधी : ४ ते ९ डिसेंबर २०२६.






