व्यवसायासाठी माहेरून २० लाख रुपये आणण्याचा तगादा; विवाहितेचा छळ
पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
इचलकरंजी : पतीच्या व्यवसायासाठी माहेरून २० लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला घराबाहेर हाकलून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आचल अभिषेक वासुदेव (वय २०, सध्या रा. गणपती कट्टा, जवाहरनगर, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी आरोपींनी लग्नात मानपान केला नसल्याचे सांगून विवाहितेचा छळ सुरू केला. तसेच पतीच्या व्यवसायासाठी माहेरून २० लाख रुपये आणावेत, असा तगादा लावण्यात आला.
पतीने शिवीगाळ करून मारहाण केली, तर सर्व आरोपींनी २० लाख रुपये आणल्याशिवाय नांदवणार नाही, अशी धमकी देत अंगावरील कपड्यांनिशी घरातून बाहेर काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी पती, सासू, सासरे, नणंद, नणंदेचे पती आणि दीर अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल इंदुलकर करीत आहेत.






