ICHMH51NEWS.IN
9921600800

राज्यस्तरीय मनोरंजन करंडक एकांकिका स्पर्धेत बॉईल्ड शुद्ध शाकाहारी प्रथम मून विदाऊट स्काय द्वितीय तर यात्रा तृतीय

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यस्तरीय मनोरंजन करंडक एकांकिका स्पर्धेत बॉईल्ड शुद्ध शाकाहारी प्रथम मून विदाऊट स्काय द्वितीय तर यात्रा तृतीय

इचलकरंजी:
येथे आयोजित करण्यात आलेल्या २६व्या राज्यस्तरीय मनोरंजन करंडक मराठी एकांकिका स्पर्धेत कलादर्शन व नाट्य शृंगार पुणे यांच्या बॉईल्ड शुद्ध शाकाहारी या एकांकिकेने प्रथम क्रमांक तर मुक्ताई फाउंडेशन पुणे यांच्या मून विदाऊट स्काय या एकांकिकेने दुसरा क्रमांक मिळवला. स्पर्धेतील तृतीय क्रमांक देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर यांच्या यात्रा या एकांकिकेने मिळविला तर लक्षवेधी एकांकिका पुरस्कार विनायक गणेश वझे महाविद्यालय मुंबई यांच्या स्पर्शाची गोष्ट या एकांकिकेने मिळविला.
स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांचे सादरीकरण लक्षात घेऊन कलाकार मंडळी पुणे यांची चाहूल आणि रंगयात्रा नाट्य संस्था इचलकरंजी यांची सरसरणाऱ्या फॅन्टसीचे युद्ध या एकांकिकांना उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर आरपीडी महाविद्यालय बेळगाव यांची हायब्रीड आणि निर्मिती नाट्य संस्था सातारा यांची लेबल या एकांकिकांना विशेष उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभ परीक्षक ज्ञानेश मोघे गोवा, मंगेश दिवाणजी पुणे व यशोधन गडकरी सांगली तसेच रोटरी क्लब इचलकरंजी सेंट्रलचे अध्यक्ष सतीश पाटील, मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सर्व परीक्षकांनी उपयुक्त असे मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. समन्वयक संजय होगाडे यांनी प्रास्ताविक केले तर स्वागत व सूत्रसंचालन संतोष आबाळे यांनी केले.
स्पर्धेमधील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये विनोद रत्ना कलादर्शन पुणे (शुद्ध शाकाहारी) यांना दिग्दर्शन प्रथम, अभिषेक हिरेमठस्वामी डी आर के कॉलेज कोल्हापूर (यात्रा) यांना द्वितीय तर प्रणव – मुकुल मुक्ताई फाउंडेशन पुणे (मून विदाऊट स्काय) यांना तृतीय क्रमांक मिळाला. पुरुष अभिनयामध्ये अमेय राजमाने (कला दर्शन, शुद्ध शाकाहारी) यांना प्रथम, राहुल पेडणेकर (वझे महाविद्यालय, स्पर्शाची गोष्ट) यांना द्वितीय तर सागर यादव (मिलाप थिएटर, इग्वाना) यांना तृतीय क्रमांक मिळाला. याचबरोबर पंढरी बी.के. बेळगाव, सौमित्र कागलकर बुधगाव, सचिन सावंत सातारा, मनीष हटकर कल्याण, सुभाष टाकळीकर जयसिंगपूर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केले.
उत्कृष्ट स्त्री अभिनय स्व. करुणा देव स्मृती पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांक खदिजा मुल्ला (राधे नाटक ग्रुप, निर्झर) द्वितीय क्रमांक ऋतुजा बोटे (कलादर्शन, शुद्ध शाकाहारी) तर तृतीय क्रमांक मानसी कुलकर्णी (फोर्थ वॉल, लॉटरी) यांना मिळाला. तसेच संचिता जोशी पुणे, मिलन डिसोजा इचलकरंजी, डॉ. यशश्री कंटक मुंबई, वैष्णवी पोतदार कोल्हापूर व श्रेया सव्वाशेट्टी बेळगाव यांना उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाले. उत्कृष्ट विनोदी अभिनय पुरुष पुरस्कार श्याम वैरागे (पीएमपीएमएल पुणे, ठसका) यांना तर विनोदी अभिनय स्त्री पुरस्कार स्नेहा धडवई (निर्मिती सातारा, लेबल) यांना मिळाला. उत्कृष्ट वाचिक अभिनय पुरुष पुरस्कार प्रमोद पुजारी (रंगप्रसंग कोल्हापूर, अलमोस्ट डेड) यांना तर उत्कृष्ट स्त्री वाचिक अभिनय पुरस्कार मानसी बोकुरे (परिवर्तन कोल्हापूर, कलम ३७५) यांना मिळाला. उत्कृष्ट नवीन लेखक पुरस्कारासाठी डॉ. निलेश माने (निर्मिती सातारा, लेबल) यांची निवड करण्यात आली.
तांत्रिक विभागामध्ये निलेश धोत्रे व प्रणव छोडे (कलादर्शन व नाट्यशृंगार पुणे) यांना पार्श्वसंगीत प्रथम, सुरेश (वझे महाविद्यालय मुंबई) यांना द्वितीय तर क्षितिजा गुरव (राधे नाटक कोल्हापूर) यांना तृतीय क्रमांक मिळाला. प्रकाश योजना प्रथम क्रमांक अभिप्राय कामटे (कलादर्शन पुणे) यांना, द्वितीय क्रमांक निखिल मारणे (मुक्ताई फाउंडेशन पुणे) यांना तर तृतीय राजेश शिंदे (आरपीडी महाविद्यालय बेळगाव) यांना मिळाला. नेपथ्य प्रथम क्रमांक ऋतुजा बोटे (कलादर्शन पुणे) यांना, द्वितीय क्रमांक सुमित शेलार व महेश शिंदे (मुक्ताई फाउंडेशन पुणे) यांना तर तृतीय क्रमांक देविदास (वझे महाविद्यालय मुंबई) यांना मिळाला. उत्कृष्ट रंगभूषा पुरस्कार मानसी कोकीळ (कलादर्शन व नाट्यशृंगार, पुणे) यांना तर उत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार सौम्या पगारे (अमरेश्वर थिएटर्स, अंबरनाथ) यांना मिळाला.
येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात चार दिवस झालेल्या या स्पर्धेत राज्याच्या विविध भागातील तसेच बेळगाव येथील ३२ संघांनी आपल्या विविध प्रकारच्या लक्षवेधी एकांकिका सादर केल्या. स्पर्धेस इचलकरंजी शहर व परिसर तसेच कोल्हापूर, सांगली, सावंतवाडी येथील नाट्य रसिकांचा त्याचबरोबर विद्यार्थी आणि युवक वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला. एकूणच या स्पर्धेच्या निमित्ताने श्रीमंत घोरपडे नाट्यगृहाचा परिसर कलाकारांच्या आणि नाट्य रसिकांच्या उत्स्फूर्त गर्दीने फुलून गेला आणि नाट्य क्षेत्रात उत्साही वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा