कै.भाई नेरुरकर चषक राज्यस्तर खो-खो स्पर्धा.कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, ठाणे, धाराशिव, मुंबई उपांत्य फेरीत

इचलकरंजी :
येथील विठ्ठल रामजी शिंदे प्रशालेच्या पटांगणावर सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे क्रीडानगरीत सुरु असलेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत विजयाची घोडदौड कायम ठेवत पुरुष गटात पुणे, कोल्हापूर, मुंबई उपनगर आणि सांगली तर महिला गटात धाराशिव, कोल्हापूर, ठाणे आणि पुणे त्याचबरोबर किशोर गटात सांगली, सातारा, पुणे आणि कोल्हापूर तसेच किशोरी गटात पुणे, धाराशिव, ठाणे आणि सांगली या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
दरम्यान, गुरुवार (२७ मार्च) रोजी संध्याकाळच्या सत्रात सर्वच गटातील अंतिम सामने होणार आहेत. या कार्यक्रमास व बक्षिस समारंभासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे .
मंगळवारी सायंकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यांत किशोर विभागात धाराशिव विरुद्ध पुणे सामन्यात धाराशिव संघाने विजय प्राप्त केला. ठाणे विरुद्ध कोल्हापूर सामन्यात ठाणे संघाने २ गुण व ३० सेकंद राखून विजय प्राप्त केला. सातारा विरुद्ध बुलढाणा सामन्यात सातारा १ गुण व ४ मिनिटे राखून विजयी झाला. किशोरी विभागात सोलापूर विरुद्ध पुणे सामन्यात पुणे संघांने ६ गुणांनी विजय मिळविला. सांगली विरुद्ध कोल्हापूर सामन्यात सांगली संघाने ७ गुण व १ डाव राखून विजय प्राप्त केला. धाराशिव विरुद्ध बुलढाणा या सामन्यात धाराशिव संघ ८ गुण व १ डाव राखून विजयी झाला. पुरुष विभागात ठाणे विरुद्ध नागपूर सामन्यात ठाणे संघाने १ गुण व १ मिनिट ३० सेकंद राखून विजय प्राप्त केला. तर महिला विभागात पुणे विरुद्ध सोलापूर या सामन्यात पुणे संघाने ११ गुणांनी विजय प्राप्त केला. रत्नागिरी विरुद्ध कोल्हापूर या सामन्यात कोल्हापूर संघाने १४ गुणांनी विजय प्राप्त केला. सांगली विरुद्ध ठाणे या ठाणे संघाने ३ गुणांनी विजयी प्राप्त केला.
किशोर विभागातील सामने संपले असून उपांत्य फेरीत पहिला सामना सांगली विरुद्ध सातारा यांच्यात तर दुसरा सामना पुणे विरुद्ध कोल्हापूर या दोन संघात होईल. तसेच किशोरी विभागातील साखळी गटाचे सामने संपले असून पुणे विरुद्ध धाराशिव संघ यांच्यात पहिला तर ठाणे विरुद्ध सांगली यांच्यात उपांत्य फेरीचा दुसरा सामना होईल.
पुरुष विभागात बाद फेरीत पुणे विरुद्ध अहिल्यानगर या सामन्यात पुणे संघाने विजय प्राप्त करून तर ठाणे विरुद्ध मुंबई उपनगर या सामन्यात मुंबई उपनगरने विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. तसेच सोलापूर विरुद्ध कोल्हापूर या सामन्यात कोल्हापूर संघाने सोलापूर संघावर मात करुन तर सांगली विरुद्ध मुंबई या सामन्यात सांगली संघाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यामध्ये आता धाराशिव विरुद्ध कोल्हापूर आणि मुंबई उपनगर विरुद्ध सांगली अशी लढत होईल.
महिला विभागात बाद फेरीत धाराशिव विरुद्ध सांगली या सामन्यात धाराशिव संघाने तर मुंबई विरुद्ध ठाणे या सामन्यात ठाणे संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर सोलापूर विरुद्ध कोल्हापूर या कोल्हापूर संघाने व पुणे विरुद्ध नाशिक या सामन्यात पुणे संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामध्ये धाराशिव विरुद्ध कोल्हापूर यांच्यात तर ठाणे विरुद्ध पुणे यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल.
कै.भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धेतील क्षण
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








