उन्हाळ्याच्या गर्दीला सामोरे जाण्यासाठी इचलकरंजी आगाराकडून जादा एस.टी. फेऱ्या
इचलकरंजी :
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगारामार्फत दि. १० एप्रिल २०२५ ते १५ जून २०२५ या कालावधीत जादा एस.टी. फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत.
या विशेष फेऱ्यांत इचलकरंजी-मुंबई (कोल्हापूर मार्गे) मार्गावर जाताना सायंकाळी ६.३० वाजता तर येताना रात्री ९.३० वाजता बस उपलब्ध असेल. इचलकरंजी-लातूर मार्गावर जाताना सायंकाळी ४.३० आणि येताना सायंकाळी ६ वाजता फेरी असेल.
इचलकरंजीहून गणपतीपुळे येथे सकाळी ६ वाजता बस रवाना होईल व परतीच्या प्रवासासाठी दुपारी १.३० वाजता बस उपलब्ध असेल. तसेच इचलकरंजी-पुणे मार्गावर सकाळी ९.३० वाजता जाताना व सायंकाळी ४ वाजता येताना फेरी चालवली जाणार आहे.
इचलकरंजी-सोलापूर मार्गावर सकाळी ५.३०, १०.३० व दुपारी २.३० वाजता जाताना व येताना अनुक्रमे सकाळी ११.३०, सायंकाळी ५ व रात्री १० वाजता परतीच्या फेऱ्या असतील.
इचलकरंजी-पुणे मार्गावर दुपारी २.३० वाजता जाताना व रात्री १० वाजता येताना फेरी उपलब्ध आहे. याशिवाय इचलकरंजी-बारामती मार्गासाठी सकाळी ६.४५ वाजता जाताना व दुपारी १.३० वाजता येताना एस.टी. बस उपलब्ध राहणार आहे.
या सर्व जादा फेऱ्यांसाठी संगणकीय आरक्षणाची सुविधा उपलब्ध असून महामंडळाच्या सवलतीही लागू असणार आहेत. प्रवासी व भाविकांनी या विशेष फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन इचलकरंजी आगार व्यवस्थापनाने केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







