विधिमंडळात दर्जात्मक व गुणात्मक चर्चा होऊन नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत- विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे
इचलकरंजी (ता.३)-आपटे वाचन मंदिराच्या ५३ व्या वसंत व्याख्यानमालेमध्ये विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधीमंडळात दर्जात्मक व गुणात्मक चर्चा होऊन नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली. पहिल्या दिवशी झालेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. डीकेटीई च्या पटांगणात ग्रंथालयाचे संचालक अॅड. स्वानंद कुलकर्णी यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी चौंडी गावच्या सरपंचांपासून ते सभापतीपदापर्यंतचा प्रवास या मुलाखतीतून सांगितला. आई वडील अशिक्षित होते परंतु आमची पुढची पिढी उच्च शिक्षित झाली. शिक्षणाने प्रगतीची दारे उघडली.
सुरुवातीस प्रा. राम शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. अहिल्यादेवींच्या माहेरकडील घरात आमचा जन्म झाला, त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत असे सांगितले. आजच्या काळातही अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची गरज आहे. त्या काळातील आहेत. लोकांच्या हितासाठी कारभार कसा असावा याचे उदाहरणच अहिल्यादेवी यांनी घालून दिले आहे. काळाच्या पुढे असणारे त्यांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शक आहेत असे ते म्हणाले आण्णा डांगे यांच्या भेटीनंतर राजकारणात माझा प्रवेश झाला. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन हे माझे नेहमीच आदर्श राहिले. आजही राजकारणात बलाढ्य शक्तीशी माझा संघर्ष सुरु आहे. अनेकदा हरलो पण जिद्द सोडली नाही. पक्षाशी असणाऱ्या निष्ठेमध्ये कधीही तडजोड केली नाही असे ते म्हणाले. क्रिकेट, कबड्डी हे माझे आवडते खेळ होते. कबड्डीतून नजर तेज झाली, त्याचा उपयोग राजकारणात झाला. असेही ते म्हणाले. माणसांना भेटणे, माणसे जोडणे आणि संघटनेत कार्यरत राहणे आवडते असेही त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्तत्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यांनी या योजनेची जबाबदारी माझ्यावर दिली. जलसंधारण हे खाते अधिक आवडले कारण या खात्याव्दारे संपूर्ण महाराष्ट्रभर जलसिंचनाची कामे करता आली असेही ते म्हणाले सर्वच प्रश्नांची अत्यंत मनमोकळी आणि हसत खेळत उत्तरे त्यांनी दिली. कर्जत-जामखेड हा दुष्काळी भाग होता, पण मोठ्या संघर्षानंतर पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. पूर्वी १०० टैंकर लागत होते. आता गेली आठ वर्षांत एकही टँकर लागत नाही. असे त्यांनी जलयुक्त शिवार व दुष्काळमुक्तीच्या कामाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले. पंतप्रधान भेटीचाही किस्सा त्यांनी समर्पकपणे सांगितला. विधान परिषदेचे सभापती म्हणून खुर्चीवर बसल्यावर न्यायाधीशाप्रमाणे काम करुन समान न्याय दयावा लागतो. या सभागृहाची प्रतिष्ठा वाढावी असे काम व्हावे असे वाटते.
सुरुवातीस संस्थेच्या अध्यक्ष सौ. सुषमा दातार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले. प्रा. राम शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत संस्थेच्या अध्यक्ष सौ. सुषमा दातार यांनी केले. माजी मंत्री प्रकाशराव आवाडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. हर्षदा मराठे यांनी केले. आमदार राहुल आवाडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत संस्थेच्या कार्यवाह कु. माया कुलकर्णी यांनी केले. डीकेटीई संस्थेच्या पटांगणात झालेल्या या मुलाखतीस श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला.
याप्रसंगी डॉ. अशोकराव सौंदत्तीकर, संस्थेचे पदाधिकारी, संचालक, मान्यवर व्यक्ती तसेच इचलकरंजीतील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांची मुलाखत घेताना अँड स्वानंद कुलकर्णी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







