मराठी भाषा जगली तर साहित्य, संस्कृती व शिक्षण जगेल-डॉ. श्रीपाद जोशी, नागपूर
इचलकरंजी दि.१७ मे –
“आपली मराठी भाषा जगली तर साहित्य, संस्कृती टीकून राहील त्याचबरोबर शिक्षण जगेल. गेल्या काही वर्षात भाषेबाबत सजगता वाढली आहे पण त्याचबरोबर भाषेचा अधिक विकास आणि वापर होण्यासाठी लोकशक्ती, लोक सहभाग हवा आणि विवेक जागृत राहायला हवा. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे एक प्रकारे हजारो वर्षाच्या संत परंपरेचे आणि बहुजन विवेकाचे यश आहे” अशा आशयाचे विचार मराठी भाषेचे अभ्यासक व मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी नागपूर यांनी मांडले.
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत ‘मराठीचा अभिजात दर्जा आणि मराठी समोरील आव्हाने’ या विषयाची विस्तृत अशी मांडणी त्यांनी आपल्या पावणेदोन तासाच्या परिणामकारक भाषणात केली. सुरुवातीला रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी चौगुले डेअरी प्रॉडक्ट्सचे सुरेश रोजे – चौगुले यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी श्यामसुंदर मर्दा आणि समीर गोवंडे हे व्यासपीठावर उपस्थित होते. संतोष आबाळे यांनी प्रास्ताविक केले तर वक्त्यांचा परिचय संजय होगाडे यांनी करून दिला.
आपल्या विषयाचा अभ्यासपूर्ण आढावा डॉ. जोशी यांनी घेतला. “२००४ साली प्रथम तामिळ भाषेला अभिजात दर्जा मिळाला. त्यानंतर संस्कृत, मल्याळम, तेलगू, कन्नड आणि उडिया या भाषांना तो मिळाला. पण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि दक्षिणेकडील राज्यांप्रमाणे भाषेबाबत ठणकावून सांगण्याच्या अभावामुळे मराठीला अभिजात दर्जा मिळण्यात वेळ गेला. २०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज देशमुख यांनी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली, त्यातून या विषयाला चालना मिळाली. २०१५ पासून मराठीसाठी विविध चळवळी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये मराठीला अभिजात दर्जा मिळाला. सामान्य माणसांनाही यामुळे खूप आनंद झाला. अभिजात दर्जामुळे भाषेसाठी होणारा सामाजिक आणि सांस्कृतिक लाभ महत्त्वाचा आहे” असे प्रतिपादन डॉ. जोशी यांनी केले.
भाषेबद्दल बोलताना “प्रमाणभाषा ही लेखनाची असते, सर्वांना समजावे म्हणून तिचा उपयोग असतो. सर्व बोलीभाषाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, त्यामध्ये शुद्ध, अशुद्ध असे काही नाही. भाषा आणि राजकारण यांनाही एकमेकांपासून वेगळे करता येत नाही.” असे डॉ. जोशी म्हणाले. याच बरोबरीने आजच्या काळात मराठीसमोर असणाऱ्या आव्हानांचाही तपशीलवार आढावा त्यांनी घेतला. “मराठी राज्यात मराठी विषय सक्तीचा करावा हे सांगावे लागते हे दुर्दैव आहे. आज मराठी व इंग्रजीबरोबर हिंदी सक्तीची करण्याचा विचार अत्यंत चुकीचा आहे. केवळ हिंदी नव्हे तर तिसरी कोणतीही भाषा अनिवार्य करू नये. युनेस्कोसहीत जगातील सर्व भाषा तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे प्राथमिक, माध्यमिक स्तरावर मुलांना तीन-तीन भाषा शिकविणे गैर आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून द्यावे असे सांगण्यात आले आहे.” अशी माहिती त्यांनी दिली.
“आज राजकीय अनास्थेमुळे १४००० मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मुंबईत काही मराठी शाळांना टाळे लागलेले आहे, विद्यार्थी संख्या कमी होत आहे. अशाप्रकारे शाळा बंद पडू लागल्या तर ७०००० शिक्षकांची नोकरी जाऊ शकेल. त्यामुळे आपण सर्व मराठी भाषिकांनी जागरूक राहणे आणि शासनाला मराठीसाठी ठणकावून सांगणे आवश्यक आहे. ही चळवळ आपण सातत्याने सुरू ठेवायला हवी त्याचबरोबर साहित्यिक, साहित्य संस्था आणि कलावंतांनीही याबाबतीत आग्रह धरला पाहिजे. मराठी केवळ अभिजात न होता आधुनिकही व्हायला हवी. भाषेबाबत कायदे होतात पण त्यांची अंमलबजावणी होण्यासाठी आपण आग्रही राहिले पाहिजे. मराठी भाषा हे आपले संचित आणि आपली ओळख आहे. भाषा आणि शिक्षण हा राज्याचा विषय आहे, केंद्राचा नाही त्यामुळे आपण सजग राहून व आपल्या भाषेचा अभिमान बाळगून कार्यरत राहणे आवश्यक आहे” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या व्याख्यानास इचलकरंजी शहर व परिसरात मराठीप्रेमी उपस्थित होते.
मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत पाचव्या दिवशी बोलताना डॉ. श्रीपाद जोशी, नागपूर.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







