ICHMH51NEWS.IN
9921600800

नाती जपली तर ती आनंदाची गुरुकिल्ली ठरू शकतात विवेक मेहत्रे, ठाणे 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नाती जपली तर ती आनंदाची गुरुकिल्ली ठरू शकतात-विवेक मेहत्रे, ठाणे 

इचलकरंजी:
“आपण सर्वांनीच आपल्या आयुष्यात नाती जपण्याचा प्रयत्न करायला हवा, जीवनातील आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि समाधानासाठी नातेसंबंध, प्रेम टिकविणे महत्त्वाचे आहे. या नात्यांना महत्त्व दिले, त्यांची जपणूक केली, तर ती आपल्यासाठी आनंदाची गुरुकिल्ली बनू शकतात” अशा आशयाचे उदगार प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ व लेखक विवेक मेहेत्रे यांनी काढले. येथील मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत ‘एका विलक्षण व्यक्तीचे अविश्वसनीय आयुष्य’ हा कार्यक्रम सादर करताना त्याच्या अनुषंगाने ते बोलत होते.
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ४७व्या व्याख्यानमालेत चौथ्या दिवशी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रमुख ग्रंथपाल युवराज पाटील पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला श्यामसुंदर मर्दा आणि समीर गोवंडे यांनी पाहुण्यांचे तसेच वक्त्यांचे गुलाब पुष्प प्रदान करून स्वागत केले. याप्रसंगी सर्वांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. संतोष आबाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर काशिनाथ जगदाळे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.
मेहेत्रे यांनी आपल्या कार्यक्रमात अमेरिकेतील होवार्ड ह्यूज या विलक्षण व्यक्तीचे अफलातून आयुष्य दृकश्राव्य सादरीकरणाच्या माध्यमातून उलगडून दाखवले.  १९०५ ते १९७६ असे आयुष्य लाभलेल्या या व्यक्तिमत्वाची विविध क्षेत्रातील बहुआयामी कामगिरी विलक्षण आहे. जगप्रसिद्ध टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावर तीन वेळा यांचे छायाचित्र छापले गेले. प्रचंड बुद्धिमत्ता आणि प्रचंड श्रीमंती असलेल्या या माणसाचे आयुष्य लोक विलक्षण होते.
एका संपन्न कुटुंबात जन्मलेल्या होवार्डने अकराव्या वर्षी स्वतःचा हॅम रेडिओ बनवला. १२व्या वर्षी दुचाकीला स्वतः मोटर तयार करून जोडली. साडेतेराव्या वर्षी तो विमान चालविण्यास शिकला. सोळाव्या वर्षी त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले तर अठराव्या वर्षीच तो अब्जाधीश बनला. होवार्ड अतिशय देखणा व रुबाबदार होता त्याचबरोबर नम्र देखील होता. त्याने स्वतःच्या विमानाची निर्मिती केली. त्याचबरोबर ९० वर्षांपूर्वी त्याने विमानातून तीन दिवस १९ तासात जगाला प्रदक्षिणा घालण्याचा विश्वविक्रम केला. बोईंग विमानाची निर्मितीही त्यांनीच केली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पाण्यातून हवेत उडणारी बोट त्यांनी बनवली. एकूणच विमान निर्मितीपासून रुग्णांसाठी सुविधाजनक यांत्रिक बेड तयार करणे तसेच महिलांसाठी उत्तम अशी ब्रा तयार करण्यासाठी डिझाईन करणे अशा कितीतरी,  वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. हॉलीवुडमध्येही त्यांनी मोठी कामगिरी केली, अनेक चित्रपट बनवले. हेल्थ एंजल्स या त्यांच्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला.
१९४६ साली झालेल्या जीवघेण्या विमान अपघातामधून तो कसाबसा, आश्चर्यकारकपणे वाचला. त्यानंतरही त्यांनी विविध प्रकारची मोठी कामगिरी केली. मात्र उत्तर आयुष्यात एकटेपणामुळे होवॉर्ड विक्षिप्तपणाकडे झुकला आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेला. १६ वर्षे त्यांनी स्वतःला हॉटेलमध्ये क्वारंटाईन करून घेतले. विमान उत्पादन व्यवसाय नुकसानीत गेला, मात्र सर्व शेअर्स विकून त्यांनी कर्ज फेडले. त्याचबरोबर सामाजिक भान ठेवून त्यांनी होवार्ड ह्यूज मेडिकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली. आयुष्याच्या शेवटी गलितगात्र अवस्थेत चटका लावणारा असा त्यांचा मृत्यू झाला. आजही या माणसाला इतिहासातील रहस्यमय अब्जाधीश म्हणून ओळखले जाते. ह्यूस्टन येथील विमानतळाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांच्यावर दहा पुस्तके लिहिली गेली तर दोन चित्रपट आणि काही मालिका त्यांच्या जीवनावर निघाल्या आहेत. अशा या व्यक्तिमत्त्वाची जीवनकथा थरारक पद्धतीने मेहत्रे यांनी रसिकांसमोर सादर केली आणि त्यांची दाद मिळवली. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमास इचलकरंजी व परिसरातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनोरंजन व्याख्यानमालेत बोलताना लेखक विवेक म्हात्रे
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा