कार्बन वायू कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न आवश्यक-डॉ ज्येष्ठराज जोशी, मुंबई
इचलकरंजी
“जागतिक पातळीवर आज तापमान वाढताना दिसत आहे आणि त्यामुळे वातावरणात बदल होऊन दुष्परिणाम घडताना दिसत आहेत. यावर एक उपाय म्हणून कार्बन वायूचे प्रमाण कमी करण्याचा आपण सर्वांनी सातत्याने प्रयत्न करायला हवा. वातावरणातील बदलामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणे, काही भागात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होणे, हिमालयातील बर्फ अधिक प्रमाणात वितळणे, उष्णतेत वाढ होणे, आरोग्य बिघडणे असे अनेक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे तापमान वाढीबाबत आपण सजग राहायला हवे” अशा आशयाचे प्रतिपादन, पद्मभूषण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ संशोधक डॉ. ज्येष्ठराज जोशी, मुंबई यांनी केले.
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४७व्या मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत आठव्या दिवशी ते बोलत होते. सुरुवातीला दि लक्ष्मी को-ऑपरेटीव्ह प्रोसेसचे चेअरमन मुकुंद फाटक यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष सतीश पाटील आणि सेक्रेटरी नागेश दिवटे यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. मर्दा फाउंडेशनचे श्यामसुंदर मर्दा उपस्थित होते. मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांनी वक्त्त्यांचा परिचय करून दिला तर समन्वयक संजय होगाडे यांनी प्रास्ताविक केले.
आपल्या भाषणात जोशी यांनी तापमान वाढीबाबत विविध गोष्टींचा आढावा घेतला तसेच वातावरणातील बदलाबाबत आपण काय करू शकतो आणि या समस्येचे परिणाम काय होऊ शकतात याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. “वातावरणातील कार्बनची पातळी कमी झाली तर तापमान घटते त्यामुळे आपण त्यासाठी काम करायला हवे. आजही ग्रामीण भारतात चूल व त्यामुळे होणारा धूर अशा प्रदूषणामुळे हजारो स्त्रिया व बालके मरतात. त्यामुळे चूल सुधारणा आणि कार्बन कमी करणे यावर काम सुरू आहे ते वाढवायला हवे. कचरा आणि शेतीतील कचरा जाळण्यामुळे प्रदूषण वाढत असल्याने त्यावरही उपाय योजना करायला हवी आणि यासाठी लोक सहभाग महत्त्वाचा आहे.” असे ते म्हणाले.
आपल्या देशातील परिस्थितीबद्दल बोलताना जोशी म्हणाले “आपला देश आजही गरीब आहे कारण कारखानदारी व उत्पादन, शेती आणि सेवा उद्योग या मधून पैसा निर्माण होत असतो. पण या तीनही क्षेत्रात जागतिक स्तरावर आपला वाटा अत्यंत कमी आहे. जगाच्या १७ टक्के आपली लोकसंख्या आहे पण जागतिक व्यापारात साधारणपणे एक दोन टक्के इतकेच आपले प्रमाण आहे. हे वाढविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. संशोधनपर आणि मूलभूत काम करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर पैसा आणि संसाधने लागतातच असे नाही. एकाग्र मनाने अभ्यास केला तर आपण संशोधन क्षेत्रातही प्रगती करू शकतो आणि त्याचा उपयोग सर्वांनाच होतो.”
जोशी यांनी आपल्या भाषणात, ते काम करीत असलेल्या विविध शैक्षणिक संस्था, विज्ञान परिषद, इत्यादी तसेच शासकीय व निमशासकीय संस्थांच्या माध्यमातून वातावरण बदलाबाबत सुरू असलेल्या विधायक कामाची माहिती सांगितली. आपल्या नागरिकांच्या स्वभावाबद्दल मिस्कीलपणे बोलताना “आपण नेहमी खूप तक्रारी करत असतो. आपल्या हातून काही घडत नसले तरी तक्रारी करण्याचा आपला स्वभाव आहे. त्यापेक्षा आपण आपल्या कामाच्या ठिकाणी, घरी, समाजात तक्रारी करण्यापेक्षा एकमेकाविषयी कौतुक व्यक्त केले तर चांगली वातावरण निर्मिती होऊ शकते. स्वार्थ बाजूला ठेवून व हसतमुख राहून आपण समाज भावनेने, देश भावनेने कार्यरत राहायला हवे तरच आपण निश्चितपणे अधिक प्रगती पथावर जाऊ” असे ते म्हणाले. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमास पर्यावरणप्रेमी रसिक उपस्थित होते.
तापमान वाढ आणि वातावरण बदलाचे परिणाम यावर बोलताना डॉ. जेष्ठराज जोशी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







