रसिकांना खिळवून ठेवणारी एका संगीतकाराची मुशाफिरी…
इचलकरंजी –
‘हीच आमुची प्रार्थना अन हेच आमचे मागणे’ या सुप्रसिद्ध प्रार्थना गीतापासून सुरू झालेली संगीतकार कौशल इनामदार यांची मुशाफिरी शेवटच्या ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गीतापर्यंत सलग अडीच तास रसिकांना खिळवून ठेवणारी ठरली. हा कार्यक्रम म्हणजे कौशल यांच्या संगीताचा आणि त्यामागच्या अनुभवांचा सुरेल तसाच अभ्यासपूर्ण असा प्रवास होता. या कार्यक्रमातून एका दर्जेदार संगीतकाराबरोबरच कवितेचे उत्तम रसग्रहण करून चाल लावणारा संगीतकार, मराठी भाषाप्रेमी आणि उत्तम गायक अशी त्यांची रुपे रसिकांना अनुभवण्यास मिळाली. रसिक वर्गानेही या मुशाफिरीस मनमोकळी दाद दिली.
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत सातव्या दिवशी इनामदार यांनी आपला कविता, किस्से, आठवणी आणि गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. तबल्यावरील उत्तम साथ अमेय ठाकूरदेसाई यांनी केली तर अस्मिता पांडे, मुंबई यांनी समर्पक असे निवेदन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शुभम डायनिंगचे दीपक निंगुडगेकर यांच्या हस्ते शिवप्रतमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष सतीश पाटील आणि समीर गोवंडे यांच्या हस्ते कलाकारांचे स्वागत करण्यात आले. संतोष आबाळे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला.
आपल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी बोलताना इनामदार यांनी “संगीतकाराचा शब्दांना चाल देण्याचा प्रवास हा त्याचा अंतकरणातला प्रवास असतो. गाण्याची चांगली – वाईट चाल याचे श्रेय, जबाबदारी संगीतकाराचीच असते. ऑस्कर वाइल्ड म्हणतात त्याप्रमाणे कलाकाराची कला दिसली पाहिजे आणि कलाकार अदृश्य राहायला हवा या भावनेतून मी संगीतकाराची भूमिका पार पाडत राहिलो. काही वेळा कवितेच्या शब्दांमधून चाल दिसते, त्याचबरोबर काही वेळा मनात साठलेलं पूर्वसंचित बाहेर येतं आणि चाल सुचते. शब्दांच्या बरोबरच त्यांच्या पलीकडील अर्थ पाहण्यातही संगीतकाराचे कौशल्य असते.” अशा आशयाचे मनोगत व्यक्त केले. “तुम्हाला कविता कळली तर तिला तुम्ही उत्तम चाल देऊ शकता. त्याचबरोबर कवी ग्रेस यांची,
क्षितिज जसे दिसते
तशी म्हणावी गाणी
देहावरची त्वचा आंधळी
छिलून घ्यावी कोणी…
अशा कवितेचे गीत करतानाही ती कविता अधिक कळत जाते” असे ते म्हणाले.
आपल्या कार्यक्रमात इनामदार यांनी सुरेश भट, कुसुमाग्रज, शांता शेळके, अरुण दाते, अशोक बागवे, मंगेश पाडगावकर… अशा अनेक दिग्गजांच्या आठवणी सांगितल्या. “संगीतकाराचे काम हे कवितेतील शब्दांना सौंदर्य प्राप्त करून देण्याचे आहे, त्याचबरोबर रसिक हे गाण्याला पूर्णत्व देत असतात त्यामुळे त्यांची दाद मिळणेही महत्त्वाचे आहे” असे ते म्हणाले. आपल्या या प्रवासात त्यांनी क्षितिज जसे दिसते, सूर मागू तुला मी कसा, घाल घाल पिंगा वाऱ्या, चिन्मया सकल हृदया, तुझ्या डोळ्यामध्ये गहि-या अशी वेगवेगळ्या शैलीमधील गाणी उत्तम रीतीने सादर करून रसिकांचा प्रतिसाद मिळविला.
बालगंधर्व चित्रपटाचा अनुभव व आठवण सांगताना “रसिक हे बालगंधर्वांचे केवळ चाहते नव्हते तर भक्त होते, त्यामुळे या चित्रपटाचे संगीत खूप जपून करावे लागले. हे करताना बालगंधर्वांच्या काळात आपण नव्हतो याची खंतही वाटली. यामधील ‘चिन्मया सकल हृदया’ या आपण संगीत दिलेल्या गाण्यास उत्कृष्ट गीताचे अनेक पुरस्कार मिळाले याचे समाधान आहे” असे इनामदार म्हणाले. याचवेळी मालिका, गझल, जाहिराती यांना संगीत देताना आलेले वेगवेगळे अनुभव आणि किस्सेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमच्या अखेरच्या सत्रात इनामदार यांनी “मराठी भाषेच्या सजग प्रेमापोटी आणि अभिमानापोटी केलेल्या ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गीताच्या, त्याच्या निर्मितीच्या आठवणी सांगितल्या. “बारा कोटी लोकांची असलेली मराठी भाषा ही महत्त्वाचीच आहे. ही भाषा वाढवायची असेल तर आपण तिचा वापर वाढवायला हवा. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसते तर ती आपली संस्कृती असते, म्हणून ती आपण जपायला हवी.” असे विचार त्यांनी व्यक्त केले. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमास रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुशाफिरी सादर करताना कौशल इनामदार व कलाकार
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








