आर्थिकदृष्ट्या सजग राहणे ही काळाची गरज आहे- प्रियदर्शिनी मुळे, रत्नागिरी
इचलकरंजी दि. २१ मे-
“आजच्या डिजिटल युगात आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूक वगैरे करताना आपण सजग राहणे ही काळाची गरज आहे. कोणतीही गुंतवणूक करताना ती आपण मान्यताप्राप्त ठिकाणी करतो काय, वारस नोंद करतो काय, अशा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर आर्थिक व्यवहार करताना त्यामध्ये फसवणूक, सायबर फ्रॉड होऊ शकतो काय, प्रलोभन आहेत काय यांचे भान आपण ठेवले आहे काय अशा सर्व दृष्टीने सजग राहणे आवश्यक असते. कारण आपला कष्टाचा पैसा कोणत्याही प्रकारे वाया गेला तर आर्थिक नुकसानीबरोबरच मानसिक स्वास्थ्यही बिघडते. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.” अशा आशयाचे प्रतिपादन आर्थिक नियोजनकार व सेबी मान्यताप्राप्त गुंतवणूक सल्लागार सौ. प्रियदर्शिनी मुळ्ये, रत्नागिरी यांनी केले.
येथील मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत नवव्या दिवशी ‘उत्तम जगण्यासाठी आर्थिक नियोजन’ या विषयावर त्या बोलत होत्या. सुरुवातीला किरण गॅस एजन्सीचे किरण बरगाले तसेच मुळ्ये आणि मनोरंजन मंडळ अध्यक्ष समीर गोवंडे, रोटरी क्लब सेंट्रल अध्यक्ष सतीश पाटील व सेक्रेटरी नागेश दिवटे यांनी शिव प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशनचे श्यामसुंदर मर्दा उपस्थित होते. यावेळी संयोजकांच्या हस्ते पाहुण्यांना पुस्तक व गुलाब पुष्प प्रदान करण्यात आले. सौ. शर्वरी गोवंडे यांनी प्रास्ताविक केले तर पद्माकर खोत यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.
आपल्या दृकश्राव्य पद्धतीने सादर केलेल्या माहितीपूर्ण भाषणात मुळ्ये यांनी एकूणच आर्थिक नियोजन करताना कोणत्या प्रकारे विचार करावा आणि काळजी घ्यावी याची तपशीलवार मांडणी केली. “उत्तम आर्थिक जगण्यात आर्थिक स्थैर्य, मानसिक शांतता व स्वतंत्रता हे सर्व घटक येतात. पैसा हे साधन आहे उद्दिष्ट नव्हे याचेही भान आपण ठेवायला हवे, कारण पैशाच्या मागे लागण्यास कोणतीही सीमा नसते. जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने पैसे हाताळणे म्हणजे आर्थिक नियोजन होय आणि आजच्या बदलत्या काळात याची खूप गरज आहे. कारण पूर्वीच्या काळी आपल्या उत्पन्नात स्थिरता होती, शिवाय वृत्ती खर्चिक नव्हती तसेच बाह्य प्रलोभने कमी होती. आज बाजारवादाच्या जगात उत्पन्नाचे स्त्रोत वाढले त्याचबरोबर खर्चही वाढले आणि अनेक प्रलोभने आपल्या समोर येत आहेत. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.”
असे त्या म्हणाल्या.
आपल्या जगण्यासाठी उपयुक्त सल्ला देताना मुळे यांनी सांगितले की “आर्थिक नियोजन करताना आपत्कालीन निधी, विमा आणि उद्दिष्ट आधारित नियोजन महत्त्वाचे आहे. आज उत्पन्न वाढले, पगार वाढला तर आधी स्वतःची कार, जागा घेणे या गोष्टीकडे लोकांचा कल असतो. पण उद्या काय होईल याची खात्री नसलेल्या जगात आधी पुरेशा आपत्कालीन निधीची व्यवस्था आपण करायला हवी. दरमहा होणारा खर्च लक्षात घेऊन एक वर्ष पुरेल इतका निधी ठेवणे आवश्यक आहे आणि त्यासाठी नियमित बचतीची गरज आहे. विमा हा घटक देखील महत्त्वाचा असून लोकांनी टर्म लाइफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स घेणे गरजेचे आहे. याबरोबरच उद्दिष्ट आधारित आर्थिक नियोजन करावे म्हणजे मुलांचे शिक्षण, कौटुंबिक गरजा इत्यादी जबाबदाऱ्या आणि त्यानंतर आपल्या इच्छा व अपेक्षा याचे भान ठेवून लोकांनी शॉर्ट टर्म, मिडीयम आणि लॉन्ग टर्म गुंतवणूक ठरवावी.
आपल्या भाषणात मुळे यांनी आर्थिक व्यवस्थापन करताना कोणत्या गोष्टी पाळायच्या आणि कोणत्या टाळायच्या याची उत्तम माहिती दिली. “स्वतःचा आर्थिक स्वभाव ओळखून आपले बजेट तयार करावे आणि ऐच्छिक खर्चाचे भान ठेवावे. कुटुंबातील सर्वांबरोबर आर्थिक चर्चा करावी आणि त्यांनाही सजग करावे. त्याचबरोबर इतरांशी विनाकारण स्वतःची तुलना करू नये. लवकर फायदा मिळवून देणाऱ्या योजनांच्या पासून दूर राहावे तसेच अनावश्यक कर्ज घेण्याबाबत सावध राहावे. महत्त्वाचे म्हणजे आर्थिक नियोजनाचे व्यवस्थापन लांबणीवर टाकू नये, वेळेवर करावे” अशा आशयाचा सल्ला त्यांनी दिला. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमास, पाऊस असतानाही रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत आर्थिक सजगता या विषयावर बोलताना प्रियदर्शनी मुळे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







