शासकीय नोकरीचं आमिष दाखवून ३३ लाखांची फसवणूक; अप्पर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
इचलकरंजी:
शासकीय नोकरी मिळवून देतो, असे आमिष दाखवून लाट (ता. शिरोळ) येथील विशाल शांतिनाथ मंडपे यांची तब्बल ३३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्यांनी इचलकरंजीत अप्पर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली असून, आरोपींविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, दशरथ गणपती काळे व शरद गणपती काळे (दोघेही रा. लाट) यांनी म्हाडा, मंत्रालय मुंबई येथे लॉ ऑफिसर पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यांनी राजकीय संपर्कांचे दाखले देत नोकरी निश्चित असल्याचे सांगून मंडपे कुटुंबाचा विश्वास संपादन केला. त्यानुसार, मंडपे यांनी या दोघांच्या खात्यावर १० लाख रुपये आरटीजीएसने तर २३ लाख रुपये रोख स्वरूपात दिले. एकूण ३३ लाखांची ही रक्कम त्यांच्या सासरच्या मंडळींनी पतसंस्थेतून कर्ज काढून दिली होती.
दरम्यान, पैसे घेतल्यानंतर दोघांनीही नोकरी संदर्भात कोणतीही कारवाई न करता वेळकाढूपणा सुरू केला. उलट पैसे मागितल्यास शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. “पोलिस स्टेशन व राजकीय नेत्यांशी आमची ओळख आहे. तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवू,” असे म्हणत धमकावण्यात आले, असे मंडपे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री, कोल्हापूर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी व कुरुंदवाड पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आली आहे.
विशाल मंडपे यांनी पोलिसांकडे तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली असून, अन्यथा आत्मदहनाचा इशाराही दिला आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







