ज्येष्ठ पत्रकार चिदानंद आलुरे यांचे निधन
इचलकरंजी :
येथील जेष्ठ पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते चिदानंद आलुरे (वय ६०) यांचे शनिवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने इचलकरंजीतील पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
चिदानंद आलुरे हे इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष होते. त्यांनी शालेय जीवनापासूनच वृत्तपत्र विक्री व्यवसायास सुरुवात केली होती. वृत्तपत्र विक्रेत्यापासून त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल केली. तरुण भारत (बेळगाव) या दैनिकाचे ते प्रतिनिधी होते, तसेच नंतरच्या काळात दैनिक जनप्रवास चे इचलकरंजी प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी कार्य केले.
ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांचा सामाजिक व व्यावसायिक जनसंपर्क दांडगा होता. त्यामुळे त्यांचा समाजातील मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई आणि आई असा परिवार आहे.
दुपारी लिंगायत रुद्रभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह,वृत्तपत्र विक्रेते व पत्रकार बांधव व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







