इमनपाच्या वतीने त्रैभाषिक काव्यसंध्या उत्साहात पार – शब्द, शायरी आणि हास्याच्या लाटांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध
इचलकरंजी, दि. १९ जून २०२५ – इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित त्रैभाषिक कवी संमेलनाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठी, हिंदी व उर्दू या तीन भाषांतील मान्यवर कवींच्या बहारदार सादरीकरणांनी श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात उपस्थित रसिकांची टाळ्यांची उधळण करत मंत्रमुग्ध अवस्था निर्माण केली.
Advt
या कार्यक्रमाचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सौ. पल्लवी पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त व कवयित्री सौ. सुषमा शिंदे-कोल्हे होत्या.सुत्रसंचालन शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी यांनी खुमासदार शैलीत करत कार्यक्रमाला रंगत आणली. त्यांनी आपल्या वक्तृत्व, टायमिंग आणि रसग्रहण क्षमतेने चार तास प्रेक्षकांना खिळवून ठेवलं.कार्यक्रमाची सुरुवात व्याकूळ गोयंका यांच्या प्रभावी हिंदी कवितेने झाली. प्रा. रोहित शिंगे यांनी आपल्या दमदार आवाजात शायरी सादर केली. मुजावर मालेगाव यांच्या विनोदी शेरांनी हास्याची खळखळ उडवली, तर कपिल शर्मा यांनी दैनंदिन जीवनावरील हास्यकवितांनी प्रेक्षकांना गुंतवून ठेवलं.विद्या पोळ यांनी आपल्या सशक्त मुक्तछंद कवितांनी रसिकांची वाहवा मिळवली. उर्दू शायरीचं सौंदर्य उलगडताना महेशर आफ्रिदी आणि सोलापूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी आपल्या शैलीने रसिकांना भावविभोर केलं.कार्यक्रमाचा शिखरबिंदू ठरला सौ. सुषमा शिंदे-कोल्हे यांचं दमदार कविता सादरीकरण आणि नंतर प्रख्यात कवी किशोर कदम यांचा प्रेक्षकांशी थेट संवाद. त्यांच्या सादरीकरणाने संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दुमदुमून गेलं.या काव्यसंध्येला दै. महासत्ता, दगडूलाल मर्दा फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, पाटणी कन्स्ट्रक्शन, फॉर्च्युन प्लाझा, उर्दू साहित्य अकादमी अँड चॅरिटेबल ट्रस्ट, मनोरंजन मंडळ व सर्वोदय विद्या केंद्र यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमास उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्ढेकर, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, मुख्य लेखाधिकारी विकास खोलपे, मुख्य लेखापरीक्षक सौ. आरती पाटील, माजी नगरसेवक, पत्रकार आणि इचलकरंजीतील विविध क्षेत्रांतील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे यांनी आभार प्रदर्शन केले.
त्रैभाषिक कवीसंमेलनाचे उद्घाटन करताना आयुक्त पल्लवी पाटील,अति आयुक्त सुषमा शिंदे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








